जळगाव - एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. एकनाथ खडसे यांच्या हस्ते अमळनेर येथील पाडळसरे धरणाचे भूमीपूजन झाले होते. मात्र, हे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खडसे यांचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही, अशी भाजपची भूमिका होती की काय अशी शंका उपस्थित होत, असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
ते गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, लता सोनवणे, माजी आमदार मनीष जैन, गुरुमुख जगवाणी, साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.
खडसेंच्या हस्तेच प्रकल्पाचे उदघाटन करू-
2019 च्या निवडणुकांदरम्यान या भागात प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सत्तेत आलो तर पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडीची सत्ता येईल. मी जलसंपदा मंत्री होईल, याची कल्पना देखील नव्हती. मात्र, योगायोगाने ही जबाबदारी माझ्यावर आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे साहेबांच्या हस्ते या धरणाचे भूमीपूजन झाले आणि त्यांच्याच हस्ते या धरणाचे उद्घाटन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
पुढील तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करणार-
मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, गेल्या सरकारमध्ये या जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री होते. मात्र, तरीही निम्न तापी प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही, हे येथील जनतेने लक्षात घ्यायला हवे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत. म्हणून आम्ही सरकार स्थापन झाल्यानंतर 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचे प्रयत्न केले. मात्र, कोरोनामुळे अडचणी आल्या. आता या प्रकल्पाच्या दरवाज्यांचे डिझाईन लवकरच आयआयटी कडून मंजूर होऊन येईल. त्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. लवकरच पहिल्या टप्प्यात पाणी अडवण्यापर्यंतचे काम होऊन आगामी दोन ते तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी दिला.
प्रकल्पासाठी निधीची घोषणा नाहीच-
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर कार्यक्रमात प्रकल्पाच्या कामासाठी ते निधीची घोषणा करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, जयंत पाटलांनी तशी कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
खडसेंनी सुचवला निधीचा प्रस्ताव-
यावेळी मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील वरखेडे-लोंढे हा प्रकल्प वाळू प्रकल्प म्हणून आम्ही राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. या प्रकल्पातून पाणी तर मिळेलच, शिवाय त्यातून वाळू विक्री करता येणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल उपलब्ध होईल. हा महसूल कोणत्या प्रकल्पांना द्यायचा, याचा निर्णय जलसंपदामंत्री घेऊ शकतात. त्यातील जास्तीत जास्त निधी निम्न तापी प्रकल्पाला मिळावा, अशी मागणी खडसे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
हेही वाचा- पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा- फडणवीस