जळगाव - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १३ फेब्रुवारी रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
काही लोक प्रसिद्धीसाठी काहीपण करतात. आततायीपणा किती करायचा, मर्यादेचा भंग करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? गोपीचंद पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी टिका केली.
मंत्री जयंत पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी दुपारी ते चोपडा शहरातील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पडळकरांनी केलेला प्रकार हास्यास्पद-
जयंत पाटील म्हणाले की, आततायीपणा किती करायचा, या मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे. स्थानिक व्यवस्थापनाने ज्यांना निमंत्रित केले आहे. सन्मानाने ज्यांना बोलावले आहे. त्यांच्या हस्ते जे उद्घाटन आहे. त्यावरच लोक विश्वास ठेवतात. आता प्रसिद्धीसाठी काही लोक, काहीही करतात. त्यांच्याबद्दल काय सांगणार? हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे, असे प्रकार करणे केविलवाणे असल्याची टीकाही त्यांनी केली.
पडळकरांकडून शासकीय आदेशाचे उल्लंघन
शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे असल्याचे यावेळी पडळकर म्हणाले. दरम्यान, पडळकर यांनी अनधिकृतपणे जमाव जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले तसेच बेकायदेशीरपणे पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत त्यांना या ठिकाणावरून बाजूला केले असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येत आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तर अनावरण सोहळा ठरलेल्या वेळेतच ठरलेल्या ठिकाणी शरद पवार यांच्या हस्तेच संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्णय-
राज्य शासनाने शिवजयंती सार्वजनिकपणे साजरी करण्यावर बंधने घालून दिली आहेत. शासनाच्या या निर्णयाला विरोधकांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची काळजी शासनाच्या अधिकृत स्तरावरून घेतली जात आहे. त्यानुसार आम्हीही शासनाच्या नियमांचे पालन करत आहोत. कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सहकार्य केले आहे. म्हणूनच महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. यापुढेही जनता सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पुण्यातील 'त्या' तरुणीच्या आत्महत्येबद्दल बोलणे टाळले-
यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येबद्दल सविस्तर बोलणे टाळले. मी या प्रकरणाबाबत खोलात माहिती घेतलेली नाही, एवढेच सांगून त्यांनी काढता पाय घेतला.
हेही वाचा- टीएमसीचे खासदार दिनेश त्रिवेदी यांची पक्षाला सोडचिठ्ठी