जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान राहुल लहू पाटील (वय 30) यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. एरंडोल शहरातील रामलीला मैदानावर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता.
वीरजवान राहुल पाटील यांना अखेरचा निरोप 5 फेब्रुवारीला कर्तव्यावर झाले होते निधन- राहुल पाटील हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. पंजाबमधील फजलखा येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थानामध्ये ते पत्नी व दोन मुलींसह वास्तव्याला होते. तेथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर भारत-पाकिस्तान सीमेवर ते कर्तव्य बजावत होते. 5 फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले. राहुल हे 2009 मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. 11 वर्षे सेवा झालेली असताना त्यांचे निधन झाले. राहुल पाटील यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर एरंडोल शहरात एकच शोककळा पसरली होती. शहरातील जय हिंद चौक, म्हसावद नाका, हिंगलाज कॉलनी, बुधवार दरवाजा, धरणगाव चौफुली यासह अनेक ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर लागले होते. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने शहरात ठिकठिकाणी सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने रस्त्यावर सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
उपस्थितांचे पाणावले डोळे- राहुल पाटील यांचे पार्थिव आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास एरंडोल येथे दाखल झाले. कुटुंबीय व नातेवाईकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. त्यामुळे उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकुल वातावरणात राहुल पाटील यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा रॅली होती. शेकडो तरुण आपल्या हातात तिरंगा धरून अंतयात्रेत पुढे चालत होते. फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत सैन्य दलाचे अधिकारी व जवान, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
सीमा सुरक्षा दल तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राहुल पाटील यांच्या पार्थिवाला चिमुरड्या मुलींनी अग्निडाग दिला. राहुल पाटील यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार असल्याने एरंडोल पंचक्रोशीत देशभक्तिपर वातावरण निर्माण झाले होते. 'भारत माता की जय', 'अमर रहे... अमर रहे... वीरजवान राहुल पाटील अमर रहे', असा जयघोष तरुणांनी अंत्ययात्रेत केला.
हेही वाचा- धक्कादायक..! अमरावतीत विवस्त्र अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह