जळगाव - शहरासह जिल्ह्यातील तापमान चांगलेच वाढले असून, तापमानाचा पारा 43 अंशांच्या पार गेला आहे. गुरुवारी जळगावात 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही चालू हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद ठरली आहे. येत्या काही दिवसात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली. या आठवड्यात पाऱ्याने 43 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली आहे. 20 मार्चपासून जिल्ह्यातील तापमान हळूहळू वाढू लागले. तेव्हा 35 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमानात काही अंशी घट झाली होती. मात्र, एप्रिलला सुरुवात होताच पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील तापमान सरासरी 40 अंश सेल्सिअस होते. मात्र, आता सातत्याने तापमानात वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहिला आहे. गुरुवारी त्यात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली असून, गुरुवारी हंगामातील 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जनजीवन विस्कळीत
सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच आता तापमानात वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात लॉकडाऊन काळात किराणा माल, दूध, औषधी अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान नागरिकांना सशर्त बाहेर पडण्यास परवानगी आहे. मात्र, तापमान वाढीमुळे नागरिक बाहेर पडणे टाळत आहेत. दुपारच्या वेळी रस्तेही निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळत आहे. काहीतरी कामानिमित्त घराबाहेर पडणारे डोक्याला रुमाल, स्कार्फ बांधून, डोळ्यांना सन गॉगल लावूनच बाहेर पडत आहेत.