जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दाभाडी येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात पोलिसांनी शवविच्छेदन अहवालात त्या मुलीवर अत्याचार झाला असून, ती तीन महिन्यांची गर्भवती होती. तसेच, तिचा गर्भपात झाल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात आता अत्याचारासह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो)चे कलम 4, 8, 11 (4) 12 आदी कलमे वाढवली आहेत.
दोन तरूण अटकेत..
या प्रकरणात पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अक्षय गोविंदा चोपडे (वय 28) व ऋषिकेश नारायण कोळी (वय 23) अशी या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही नवी दाभाडी येथील रहिवासी आहेत. ते पीडित मुलीला सतत त्रास देत होते. त्याच नैराश्यातून मुलीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
जामनेर तालुक्यातील दाभाडी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने 'प्रपोज डे'च्या दिवशी आत्महत्या केली होती. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात तिने 'आय लव यू ऋषिकेश, तुला माहिती नसेल मी तुझ्यावर किती प्रेम करते ते. ऋषी तुने जर मला विसरण्याची कोशीश केली ना...' अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. ही घटना समोर आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तपास करत दोन संशयित तरुणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता.
वैद्यकीय अहवालात धक्कादायक बाब आली समोर..
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात तिच्यावर अत्याचार झाला असून, ती तीन महिन्यांची गर्भवती होती. तसेच, तिचा गर्भपात झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अटकेतील तरुणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यातून त्यांनी पीडितेवर अत्याचार केला आहे किंवा नाही याचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : कोल्हापूर: वृद्धेच्या खुनाचा काही तासांतच छडा; धक्कादायक माहिती उघडकीस