जळगाव - विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी(दि.21ऑक्टो)ला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले साहित्य वितरीत करण्यात आले. हे साहित्य घेऊन दुपारी सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.
जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये 3 हजार 586 मतदान केंद्र असून, या केंद्रांवर 16 हजार 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यांमध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशिन्स, शाई तसेच आवश्यक स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. हे साहित्य घेऊन मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त असलेले कर्मचारी एस. टी. महामंडळाच्या बसगाड्यांमार्फत मतदान केंद्रावर रवाना झाले.
जिल्ह्यातील मतदारसंघांसाठी ११ निवडणूक निर्णय अधिकारी, ३३ साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने 6 हजार 513 बॅलेट युनिट, 4 हजार 430 कंट्रोल युनिट तसेच 4 हजार 882 व्हीव्हीपॅट मशिन्स उपलब्ध करून दिले आहेत.
कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य
मतदानाची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 32 पोलीस निरीक्षक, 178 साहाय्यक पोलीस निरीक्षक हजर असणार आहेत यांसोबतच 4 हजार 296 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसेच हेड कॉन्स्टेबल, 1 हजार 296 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या दोन तर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 कंपन्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.