जळगाव - संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या एका तरुणीसह ८ जणांवर जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी इच्छादेवी चौकात कारवाई केली. यात पोलिसांनी २ दुचाकी आणि ३ मालवाहतूक वाहने जप्त केली आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहे. तरीदेखील नागरिक शहरात विनाकारण दुचाकीने फिरून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत; विद्यार्थी, प्रशिक्षित तरुण आणि पालकांवर होणार परिणाम
शुक्रवारी सकाळी इच्छादेवी चौकात एक तरुणी तोंडावर मास्क न घालता दुचाकीवरुन (क्रमांक एम.पी. 09 एस.जे. 6037) जात असताना एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांनी तिला चौकशीसाठी थांबवले. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर तरुणी विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे निष्पन्न झाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पादचाऱ्यांवर आणि मालवाहतुक वाहनांच्या चालकांविरुध्द गुन्हे दाखल...
तिलक बन्नालाल सारसद (२५, रा. गुरुनाथनगर, शनिपेठ), दीपक संतोष त्रिपाठी (२४, रा. रामेश्वर कॉलनी), योगेश वाणी (४८, संत ज्ञानेश्वर चौक, मेहरूण), गोकुळ पाटील (२५, रा. लमांजन) या नागरिकांवर विनाकरण रस्त्यावर फिरल्यावरुन पोलिसांनी कारवाई केली. तर राजेंद्र जाधव (२३, रा. रामेश्वर कॉलनी), काशिनाथ चव्हाण (रा. सुप्रीम काॅलनी) राहुल पवार (२८, रा. मोहाडी ता. जळगाव), हर्षल माळी (२४) या चौघांपैकी एकाची दुचाकी आणि उर्वरित तिघांची मालवाहतुक करणारी वाहने जप्त केली.
या सर्व व्यक्तीमवर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षण रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फाैजदार रामकृष्ण पाटील, मालती वाडिले, आशा सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.