जळगाव - कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची राज्यात टंचाई भासत आहे. त्यामुळे साठेबाज नफेखोरीसाठी सक्रिय झाले आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने या इंजेक्शनचे वितरण आपल्या नियंत्रणाखाली आणल्याचा दावा केला आहे. परंतु, अजूनही त्याचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या दोन दिवसात जळगाव पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या छापेमारीत काळ्याबाजारात विक्री होणारे 12 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. याप्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तर 12 जणांविरुद्ध जळगावात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेमडेसिवीर शासकीय नियंत्रणात वितरित होत असल्याचा दावा फोल ठरला आहे.
हेही वाचा-बांगलादेश, सिंगापूर आणि इजिप्त देशाकडून राज्यसरकार करणार रेमडेसिवीर इंजेक्शन आयात
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश -
जळगावात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून 7 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. या कारवाई पोलिसांनी पहिल्या छाप्यात 9 तर दुसऱ्या छाप्यात 3 अशा एकूण 12 जणांना अटक केली. सर्वात पहिली कारवाई भुसावळ शहरात झाली आहे. याठिकाणी पॅथॉलॉजी लॅबच्या मालकासह त्याच्याकडे कामावर असलेल्या तरुणाला अटक केली होती. कारवाईची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा-नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शन विकताना वॉर्डबॉयसह तिघांना अटक
पहिला छापा सकाळी 11 वाजता-
रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी सकाळी 11 वाजता एका पथकाने स्वातंत्र्य चौकात अचानक छापा टाकला. तेथे संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी तेथून शेख समीर शेख सगीर (वय 23, रा. शिवाजीनगर) याला अटक केली. त्यानंतर संपूर्ण टोळीची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी नवल लालचंद कुंभार (वय 25, रा. खंडेरावनगर), सुनील मधुकर अहिरे (वय 32, रा. हरिविठ्ठलनगर), झुल्फीकार अली निसार अली सैय्यद (21, रा. इस्लामपुरा, धानोरा, ता. चोपडा), मुसेफ शेख कय्युम (वय 28, रा. मास्टर कॉलनी), डॉ. आले मोहम्मद खान, सैय्यद आसिफ इसा (वय 22, रा. सुप्रीम कॉलनी), अझीम शहा दिलावर शहा (वय 20, रा. सालार नगर), जुनेद शहा जाकीर शहा (वय 23, रा. सालारनगर) यांना अटक केली. शुक्रवारी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या 9 जणांकडून 5 रेमडेसिवीर इंजेक्शन व दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 46 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा-ऑक्सिजन, रेमडेसिवीर वाहतूक विमानाने करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
दुसऱ्या छाप्यात तिघांना अटक-
पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने शुभम राजेंद्र चव्हाण (वय 22, रा. झुरखेडा, ता. धरणगाव), मयूर उमेश विसावे (वय 27, रा. श्रद्धा कॉलनी), आकाश अनिल जैन (रा. आंबेडकर मार्केटजवळ) यांना अटक केली आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना सापळा रचून त्यांना पकडले. या तिघांकडून 2 इंजेक्शन, दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे सारे आरोपी नागरिकांकडून एकेका इंजेक्शनसाठी 22 हजार रुपयांपासून 33 हजार रुपयांपर्यंत पैसे उकळत होते.
आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता-
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात खासगी आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईवेळी एक डॉक्टर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे त्याच्या वितरणावर शासकीय नियंत्रण आहे. अशाही परिस्थितीत काळाबाजार होत असल्याने नफेखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या साऱ्या प्रकारात काही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे दिसून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनदेखील पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी केले.
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा
दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. राज्यात असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यामुळे आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश, सिंगापूर आणि इजिप्त या देशाकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे.