जळगाव - महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी विशेष स्थायी समिती सभेत सन 2020-21 साठीचे 1 हजार 141 कोटी 96 लाख 57 हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. एकूण 168 कोटी 75 लाख 31 हजार रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. अंदाजपत्रकात हॉकर्सकडून आकारण्यात येणाऱ्या दैनंदिन बाजार वसुली शुल्कात वाढ प्रस्तावित असून ती 20 रुपयांवरुन 50 रुपये प्रतिदिन करण्याचा प्रस्ताव आहे.
हेही वाचा -
जळगाव महापालिका महासभा: सरदार पटेलांच्या पुतळ्यावरुन भाजप-सेनेत वादंग
स्थायी समितीची सभा सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रभारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत या अंदाजपत्रकावरील तरतुदींचा आढावा घेतला. प्रत्यक्ष अंदाजपत्रक 582 कोटी 26 लाखांचे असून अंदाजपत्रकात प्रारंभीची शिल्लक 128 कोटी 82 लाख इतकी आहे. त्यात प्रत्यक्षात महापालिकेचे उत्पन्न 582 कोटी 26 लाख रुपये तसेच अनुदाने 91 कोटी 82 लाख, मनपा निधी 90 कोटी 61 लाख रुपयांचा तर शासकीय निधी 377 कोटी 27 लाख रुपये दाखवला आहे. असे एकत्रित अंदाजपत्रक 1 हजार 141 कोटी 96 लाख 57 हजार रुपयांचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
हेही वाचा -
जळगाव तहसील कार्यालयाला शॉर्टसर्किटने आग; 3 खोल्यांमधील दस्तऐवज खाक
हॉकर्सवर संक्रांत
महापालिकेच्या अंदाजपत्रकात कुठल्याही प्रकारची करवाढ सुचविण्यात आलेली नाही. त्यामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूंमध्ये शहरातील हॉकर्सकडून वसुल केल्या जाणाऱ्या दैनंदिन बाजार शुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. सध्या हे शुल्क प्रतिदिन 20 रुपये असून ते 50 रुपये इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभापती शुचिता हाडा यांनी सभा तहकूब केली. पुढील सभेत स्थायी सभापतींकडून सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे.
असा येईल रुपया (उत्पन्नाची जमा बाजू ) -
स्थानिक संस्था कर 4 कोटी, जमिनीवरील कर 29 कोटी 30 लाख 22 हजार, इमारतीवरील कर (घरपट्टी) 53 कोटी 27 लाख 6 हजार, वृक्ष कर 1 कोटी 29 लाख 21 हजार, जाहिरात कर 50 लाख, कर रिबेट 15 लाख, नगररचना 9 कोटी 38 लाख 98 हजार, वैद्यकीय सेवा 21 लाख, बाजार कत्तलखाने व इतर 3 कोटी 50 लाख 46 हजार, मनपा मिळकतींपासून उत्पन्न 256 कोटी 45 लाख 65 हजार, किरकोळ वसुली उत्पन्न 2 कोटी 54 लाख 92 हजार, अनुदाने 91 कोटी 82 लाख 88 हजार, असाधारण जमा (देवघेव) 33 कोटी 24 लाख 19 हजार, परिवहन स्वामित्वधन व उत्पन्न 3 लाख 8 हजार, पाणीपुरवठा कर 58 कोटी 42 लाख 47 हजार, मलनिस्सारण कर 5 कोटी 4 लाख 58 हजार, आरंभीची शिल्लक 128 कोटी 82 लाख 76 हजार, विविध मनपा निधी 90 कोटी 61 लाख 85 हजार, विशेष शासकीय निधी 377 कोटी 27 लाख 54 हजार, एकूण जमा 1141 कोटी 96 लाख 57 हजार रुपये.
असा जाईल रुपया (खर्चाची बाजू ) -
सामान्य प्रशासन 45 कोटी 96 लाख 57 हजार, सार्वजनिक सुरक्षितता 24 कोटी 3 लाख 98 हजार, सार्वजनिक आरोग्य व सुखसोयी 104 कोटी 48 लाख 9 हजार, सार्वजनिक शिक्षण 15 कोटी 49 लाख 39 हजार, इतर किरकोळ 29 लाख, भांडवली खर्च (मनपा निधीतून) 151 कोटी 91 लाख 83 हजार, देवघेव 17 कोटी 9 लाख 75 लाख, पाणीपुरवठा खर्च 33 कोटी 98 लाख 24 हजार, परिवहन खर्च 3 कोटी 80 लाख, विविध मनपा निधी 90 कोटी 61 लाख 85 हजार, विशेष शासकीय निधी 377 कोटी 27 लाख 54 हजार, अखेर शिल्लक 168 कोटी 75 लाख 31 हजार एकूण खर्च - 1141 कोटी 96 लाख 57 हजार रुपये