जळगाव - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मनपाकडून कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. कोविड केअर सेंटर व रुग्णालये तसेच कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवर आतापर्यंत २ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच हा निधी मनपा फंडातून देण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मागील सात महिन्यांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाकडून शहरात सहा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. शिवाय ज्या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळला तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत होता. यासह मनपाचे छत्रपती शाहू महाराज रुग्णालय कोरोना बधितांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यासाठी लागणारा जवळपास 80 टक्के खर्च मनपा फंडातून करण्यात आला आहे.
वित्त आयोगाच्या निधीचा वापर -
राज्य शासनाने 13 व 14 व्या वित्त आयोगातील निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खर्च करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाने 80 लाखापेक्षा अधिकचा खर्च वित्त आयोगाच्या निधीतून केला आहे. सप्टेंबरअखेर पर्यंत मनपाकडून 2 कोटी 33 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
आमदार निधीतून मिळाली 40 लाखांची रक्कम -
शहराचे दोन्ही आमदार सुरेश भोळे व चंदूलाल पटेल यांनी प्रत्येकी 50 लाख प्रमाणे 1 कोटींचा निधी मनपाला दिला होता. त्यातून मनपाने विविध साहित्य व अँटीजन किटसाठी निविदा मागवल्या. तब्बल दोन महिने ही निविदा प्रक्रिया सुरू होती. दरम्यान 1 कोटी पैकी मनपाला अद्याप 40 लाख रुपयांचा निधी मिळाला असून, केवळ 5 लाख रुपयांचाच निधी खर्च केला. कोरोनाची तपासणी करण्यासाठी मनपाने 20 हजार अँटीजन किट देखील खरेदी केल्या.