जळगाव - लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांना भरमसाठ रकमेची वीज बिले पाठवली आहेत. ही बिले रद्द करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(मनसे)वतीने राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. जळगावमध्येही मनसेने मोर्चा काढला होता.
नागरिक आर्थिक संकटात -
मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यानंतर खबरदारी म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. असे असताना महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य जनतेला वाढीव वीज बिले दिली आहेत. ही बिले सर्वसामान्य माणूस भरू शकत नाही. त्यामुळे सरकारने ही वीज बिले रद्द करावी, अशी मागणी मनसेच्यावतीने केली होती. ही मागणी लक्षात घेऊन सरकारने सुरुवातीला वीज बिले रद्द करण्याचे आश्वासनही दिले होते.
आश्वासनापासून सरकार फिरले -
अगोदर सरकारने वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आता ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलांमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. रिडींगनुसार आलेली बिले भरावीच लागतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा धक्का बसला. सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप मनसे केला आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार -
जळगावात मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. माजी आमदार अॅड. जयप्रकाश बाविस्कर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमिल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने वाढीव वीज बिले रद्द केली नाही तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन -
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने वाढीव वीज बिले रद्द करावीत, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.