जळगाव - महापालिकेने हुडको (हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हुडकोच्या कर्जाची परतफेड करण्यासंदर्भातील प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेला मोठा प्रश्न सुटला आहे.
1989 ते 2001 या कालावधीत तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध विकास योजनांसाठी 'हुडको' या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात हुडकोचा 271 कोटी 73 लाख रुपयांचा किंवा त्यात समाविष्ट असलेले दंडनीय व्याज वगळल्यास, उर्वरित 233 कोटी 91 लाख रुपयांच्या रकमेची एकाचवेळी परतफेड करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने आवश्यक रक्कम हुडकोला देण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महापालिकेला निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यापैकी 50 टक्के रक्कम महापालिकेकडून दर महिना 3 कोटी रुपये याप्रमाणे वसूल करण्यात येणार आहे.
सत्ताधारी भाजपचे मोठे यश
हुडकोच्या कर्जाचा हफ्ता फेडताना महापालिका प्रशासनाला असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता हा विषय मार्गी लागल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सत्ताधारी भाजपचे हे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर महापालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.