जळगाव - जम्मू काश्मिरमध्ये सैन्य दलाच्या सेवेत तैनात असताना, जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र यश दिगंबर देशमुख यांना गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आले. आज चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव या मूळगावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या लहान भावाने त्यांना मुखाग्नी दिली.
मुळगावी झाले अंत्यसंस्कार
हुतात्मा जवान यश देशमुख यांचे पार्थिव आज सकाळी नाशिक येथून लष्कराच्या गार्ड टीमने मुळगावी आणले होते. यश यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्थानिक प्रशासनाने सर्व तयारी केली होती. अंत्यसंस्काराप्रसंगी ४० क्विंटल झेंडुची फुले वापरून गावकऱ्यांनी आपल्या वीर मुलाला अखेरचा निरोप दिला. सजवलेल्या ट्रॅक्टरवरून त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी नेण्यात आले. पिंपळगावसह चाळीसगाव तालुक्यात ठिकठिकाणी यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
कुटुंबीयांचा हृदय हेलावणारा आक्रोश -
शेतकरी कुटुंबात जन्मलेले यश हे लहानपणापासून मनमिळाऊ स्वभावाचे होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सतत चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असत. त्यामुळे गावातील प्रत्येक जण त्यांच्याशी परिचित होता. वडिलांनंतर घरातील कर्ता म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. सैन्य दलात नोकरीला लागल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ते शहीद झाले. त्यांच्या निधनामुळे देशमुख कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले आहे. अंत्यसंस्कारावेळी वडील दिगंबर देशमुख, आई सुरेखाबाई, मोठ्या दोन्ही बहिणी तसेच लहान भावाने प्रचंड आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती -
यश देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देशमुख कुटुंबीयांना राज्य शासनाकडून 1 कोटी रुपयाच्या मदतीची घोषणा -
यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व कृषिमंत्री दादा भुसे यांनी यश देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. सैन्य दलातील जवान हुतात्मा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत केली जात असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.
भावपुर्ण वातावरणात निरोप -
हुतात्मा जवान यश देशमुख यांचे मित्र, गावातील तरुण व ग्रामस्थ मनावर दगड ठेऊन आपल्या दुःखाला आवर घालत सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यश यांच्या मित्र परिवाराला त्यांच्या निधनाची बातमीने मोठा धक्का बसला आहे. काही मित्रांनी यश यांच्या आठवणींना उजाळा दिला. पिंपळगावसह चाळीसगाव तालुक्यात ठिकठिकाणी यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले होते. अंत्यसंस्काराप्रसंगी तब्बल ४० क्विंटल झेंडुची फुले व २ क्विंटल रांगाेळी काढण्यात आली. गावात प्रत्येक घरासमोर रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. शिवाय भलामोठा तिरंगा अंत्ययात्रे वेळी गावकऱ्यांनी घेतला होता. यावेळी भारत माता की जय आणि यश देशमुक अमर रहे च्या घोषणा देण्यात येत होत्या. त्याच बरोबर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा ही देण्यात आल्या.
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी वीरमरण -
यश देशमुख यांचा जन्म ६ एप्रिल १९९९ रोजी झालेला होता. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने ते आधीपासूनच मेहनती होते. लहानपणापासून लष्करी सेवेचे त्यांना आकर्षक होते. मोठे झाल्यावर सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे त्यांचे ध्येय होते. मात्र, सैन्यात दाखल झाल्यानंतर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ते सर्वांना सोडून गेले.