जळगाव- शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी शहराचा पारा ४४ अंशावर पोहचला होता. त्यामुळे, जळगाव शहर हे राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले, तर देशात पहिल्या ७ शहरांमध्ये जळगावचा समावेश राहिला. गेल्या २ आठवड्यांपासून शहराचा पारा ४१ ते ४४ अंशादरम्यान स्थिर असून पुढील आठवड्यात पारा ४५ अंशाचाही पुढे जाण्याची शक्यता आहे.
यंदा तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या २ आठवड्यांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. सूर्याचे किरण लंबरूप पडत आहेत. त्यातच पश्चिम-उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेच्या झळा अधिक बसत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच असले तरी घरात देखील उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. त्यातच यंदा लॉकडाऊनमुळे कुलर, एसी देखील नागरिकांना खरेदी करता आले नाहीत. उष्णतेमुळे पंख्यांमधून गरम हवा फेकली जात आहे, त्यामुळे घरात थांबणेही असह्य झाले आहे. दुपारच्या वेळेस तापमानाचा पारा अधिक असल्याने दुपारी लॉकडाऊनचा भंग करणाऱ्यांना वाढत्या तापमानाने वठणीवर आणल्याचे चित्र आहे.
दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंतचा काळ धोकादायक
सर्वाधिक ४४ अंशाचा पारा दुपारी ३ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कायम असतो. अशा परिस्थितीत दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या काळात घराबाहेर निघणे टाळण्याची गरज आहे. या वेळेतच तापमानाचा पारा अधिक असल्याने उष्माघाताची शक्यता अधिक असते. दरम्यान, यंदा उन्हाळ्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये कमी पाहायला मिळत आहे. तापमानाचा पारा जास्त असल्याने नागरिकांनी उष्माघात होणार नाही यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची गरज आहे. बाहेर अधिक कष्टाची कामे बंद करावीत, शेतकऱ्यांनी सकाळच्या वेळेस कामे उरकून घ्यावीत, यासह कॉफी व मद्याचे सेवन देखील टाळावे, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.
गुरुवारी दिवसभराच्या तापमानाची स्थिती
सकाळी ७- २८ अंश, सकाळी ९- ३१ अंश, सकाळी ११- ३४ अंश, दुपारी १२- ३९ अंश, दुपारी २- ४१ अंश, दुपारी ३- ४४ अंश, सायंकाळी ५- ४० अंश, सायंकाळी ७- ३४ अंश.
आगामी ५ दिवसांच्या तापमानाचा अंदाज
१ मे- ४३, २ मे- ४४, ३ मे- ४३.५, ४ मे- ४४.५, ५ मे- ४४.५
हेही वाचा- जळगावात कोरोनाचा दहावा बळी; 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू