जळगाव - कोव्हॅक्सिन लसीचे जिल्ह्यासाठी २३०० डोस प्राप्त झाले आहेत. उपलब्ध झालेले हे डोस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील स्वाध्याय भवन व रोटरी भवनाच्या लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.
जिल्ह्यात लसीचे पुरेसे डोस राज्य सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले आहे. सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या लसींमध्ये दुसऱ्या डोसचेच नियोजन केले जात आहे. मात्र, त्यातही आता लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यात आल्याने केंद्रांवरील गर्दी कमी झाली आहे.
कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांची वाढली होती चिंता-
कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळत नव्हता. त्यामुळे त्यांची चिंता वाढली होती. परंतु, आता जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या २३०० डोसमुळे ही अडचण तात्पुरत्या स्वरुपात दूर झाली आहे.
या केंद्रांवर मिळेल कोविशिल्डचा डोस-
शाहू महाराज रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, मास्टर कॉलनीतील मुलतानी हॉस्पिटल, शाहीर अमरशेख हॉस्पिटल, या केंद्रांवर कोविशल्डच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य राहणार आहे.
या केंद्रांवर मिळेल कोव्हॅक्सिन-
गणपतीनगरातील स्वाध्याय भवन, मायादेवीनगरातील रोटरी भवन या ठिकाणी कोव्हॅक्सिनचा केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे.