जळगाव - शहरातील सराफा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. या बाजारात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, अलीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सुमारे दीडशे वर्षांच्या काळात प्रथमच जळगावातील सराफा बाजार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या सणाला बंद राहणार आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सराफा बाजारातील सर्वच शोरुमचे शटर बंद असून दीडशे ते दोनशे कोटींचे व्यवहार थांबले आहेत.
शहरातील सराफा बाजाराला दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. 'विश्वास हीच परंपरा' मानून देशभरातील ग्राहक सोने आणि चांदी खरेदीसाठी जळगावात येत असतात. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड महिन्यांपासून या सराफा बाजारातील व्यवहार ठप्प आहेत. दागिने घडवणारे बंगाली कारागीर, सुवर्णपेढ्यांमध्ये काम करणारा कामगार वर्ग तसेच सराफा बाजारातील अन्य घटकांवर अवलंबून असलेल्या लोकांचा विचार केला तर सराफा बाजारातील ठप्प झालेल्या व्यवहारांचा आकडा हा अडीचशे कोटींच्याही पुढे आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात आला नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन अजून पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावातील सराफा व्यावसायिक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची स्थिती अजून बिकट होण्याची भीती आहे.
अक्षय्यतृतीयेचा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. या शुभ मुहूर्तावर केलेली सोन्याची खरेदी ही अक्षय्य मानली जाते. त्यामुळे जळगावातील सराफा बाजारात दरवर्षी अक्षय्यतृतीयेला सोने-चांदीची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. मात्र, यावर्षी अक्षय्यतृतीयेच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. लॉकडाऊनमुळे सराफा बाजार बंद असल्याने अक्षय्यतृतीयेच्या दिवशी एक रुपयाची देखील उलाढाल होणं शक्य नाही. शिवाय शुभ मुहूर्तावर इच्छा असूनही सोने खरेदी करता येणार नसल्याने अनेकांचा हिरमोड होणार आहे. लॉकडाऊनमुळे सराफा बाजारातील उलाढाल गेल्या दीड महिन्यांपासून ठप्प असल्याने सराफा व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन संदर्भात पुढेही अनिश्चितता असल्याने सराफा व्यावसायिक हतबल झाले आहेत.
लॉकडाऊनमध्येही सोने-चांदीला झळाळी; मल्टी कमॉडिटी एक्सचेंजचा परिणाम -
लॉकडाऊनमुळे सराफा बाजारातील व्यवहार ठप्प आहेत. मात्र, मल्टी कमॉडिटी एक्सचेंज सुरूच असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही सोने-चांदीचे दर वधारत आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने-चांदीचे दर नवनवे उच्चांक गाठत आहेत. शुक्रवारी सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रतितोळा होते. अशीच परिस्थिती कायम राहिली तर लवकरच सोन्याचे दर 50 हजार रुपये प्रतितोळा टप्पा गाठतील, अशी शक्यता आहे. कोरोनामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. सराफा बाजारातील अर्थकारण बंद असले तरी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सौदे सुरू असून त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे. याशिवाय कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात-निर्यात ठप्प आहे. त्याचाच परिणाम भारतीय रुपयावर झाला आहे. रुपयाचे सतत अवमूल्यन होत असल्यानेही सोन्याचे दर वधारत आहेत, अशी माहिती जळगाव जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
सोन्यावरील आयात शुल्क कमी करावे -
सध्याच्या काळात सराफा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सराफा व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी करायला हवे, अशी सराफा व्यावसायिकांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीचा समावेश मौल्यवान धातूमध्ये करण्यात आला आहे. सराफा व्यवसाय हा जीवनावश्यक प्रकारात मोडत नाही. त्यामुळे मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमधून सोने आणि चांदीचा समावेश वगळला पाहिजे. जेणेकरून सराफा व्यवसायाला स्थिरता मिळू शकते, असेही अजय ललवाणी यांनी यावेळी सांगितले.