जळगाव - केळीसाठी प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्हा आता जगाच्या नकाशावर उठून दिसू लागला आहे. याला कारणही तसे अनोखे आहे. जळगावच्या केळीला 2015-16 मध्ये जीआय मानांकन मिळाले होते. मात्र, गेल्या 5 वर्षांत जीआय मानांकनाच्या टॅगखाली आतापर्यंत जळगावच्या केळीची परदेशात निर्यात झालेली नव्हती. अखेर ही प्रतीक्षा संपुष्टात आली असून, जळगावच्या 'जीआय' मानांकित केळीचा गोडवा सातासमुद्रापार पोहचला. 'अपेडा'च्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी येथून 20 मेट्रिक टन केळीचा एक कंटेनर नुकताच दुबईला रवाना झाला. यानिमित्ताने जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे आपली पावले टाकली आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
जळगाव जिल्हा हा केळी आणि कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या एकूण लागवड क्षेत्रापैकी सर्वाधिक 5 ते साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र कापसाचे असते. तर केळीचे क्षेत्रफळ 52 ते 55 हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात केळीचे लागवड क्षेत्र अधिक आहे. त्यातल्या त्यात रावेर तालुक्यात केळीची सर्वाधिक लागवड होते. रावेर तालुक्यातील तांदलवाडी हे गाव मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम केळीच्या उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. येथील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या केळीचा दर्जा वाढवला आहे. विशिष्ट चव, रंग आणि आकारासाठी तांदलवाडीच्या केळीची ओळख आहे. याच तांदलवाडी गावातून जीआय मानांकित केळी थेट दुबईला निर्यात झाली आहे.
- तांदलवाडीचे वेगळेपण-
रावेर तालुक्यातील तांदलवाडी हे सुमारे 5 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील बहुसंख्य शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. येथील केळी उत्पादक शेतकरी वर्षाकाठी 350 कंटेनर म्हणजेच सुमारे 7 ते साडेसात हजार मेट्रिक टन निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतात. उत्पादित होणाऱ्या केळीपैकी काही माल हा देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत तर काही माल हा परदेशात निर्यात होत असतो. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. याच गावातील प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी पहिल्यांदा जीआय मानांकित केळीची परदेशात निर्यात केली आहे. आतापर्यंत या गावातील केळीची परदेशात निर्यात होत होती. मात्र, जीआय मानांकन या टॅगखाली पहिल्यांदा केळीची निर्यात झाली असून, शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.
- 'अपेडा'ने पुढाकार घेतल्याने झाली निर्यात शक्य-
जीआय मानांकित केळीच्या निर्यातीबाबत बोलताना तांदलवाडी येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील सुमारे 90 शेतकऱ्यांनी जीआय रजिस्ट्रीकडे नोंदणी केली आहे. त्यात तांदलवाडी येथील काही शेतकऱ्यांचा समावेश आहे. आमच्या केळीला सन 2015-16 मध्ये जीआय मानांकन प्राप्त झाले होते. पण आतापर्यंत आम्ही जीआय मानांकन टॅगखाली केळीची निर्यात करू शकलो नव्हतो. आमचे प्रयत्न सुरू होते. परदेशात शेतमाल निर्यात करणाऱ्या अनेक कंपन्यांशी संपर्क केला होता. यावर्षी ॲग्रीकल्चर अँड प्रोसेसस्ड फूड प्रोडक्टस एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच 'अपेडा'ने पुढाकार घेतल्याने आम्हाला जीआय मानांकित केळी दुबईला पाठवता आली. अपेडाने मध्यस्थी करत गुजरातमधील नवसारी येथील देसाई ॲग्री फूड्स नावाच्या कंपनीशी आमचा संवाद साधून दिला. त्यातून 20 मेट्रिक टन जीआय मानांकित केळी ट्रकने मुंबईला व तेथून जेएनपीटी बंदरावरून थेट दुबईला निर्यात करता आली, असे प्रशांत महाजन यांनी सांगितले.
- प्रतिक्विंटल 200 ते 250 रुपयांचा नफा-
प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन पुढे म्हणाले की, जीआय मानांकित केळी परदेशात निर्यात होत असल्याने स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत आम्हाला प्रतिक्विंटल 200 ते 250 रुपयांचा अधिकचा नफा मिळाला आहे. पहिल्याच वेळी केळीला प्रतिक्विंटल 1450 रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे. केळीची कापणी केल्यानंतर तिची महाजन बनाना एक्स्पोर्टच्या पॅक हाऊसमध्ये पॅकिंग करण्यात आली. केळीचे हे अत्याधुनिक पॅक हाऊस महाराष्ट्रातील पहिले पॅक हाऊस आहे, असे प्रशांत महाजन म्हणाले.
- आता पुढचे लक्ष्य युरोपियन बाजारपेठ-
जळगाव जिल्ह्यातील निर्यातक्षम केळी पूर्वीपासून अरब राष्ट्रांमध्ये निर्यात होत आहे. मात्र, दुबईला जीआय मानांकित केळी प्रथमच निर्यात झाली आहे. या माध्यमातून जळगावच्या केळीला मागणी वाढेल. यापुढे जीआय मानांकित केळी इराण, इराक, बहरीन, ओमान, अबुधाबी या देशांमध्ये निर्यात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचे उद्दिष्ट युरोपीयन बाजारपेठ काबीज करण्याचे असेल, असेही प्रशांत महाजन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
- काय आहे जीआय मानांकन?
जीआय मानांकन ही विशिष्ट संज्ञा आहे. त्यावरून एखाद्या उत्पादनाचे भौगोलिक स्थान निश्चित होते. एखाद्या उत्पादनाच्या प्रदेशाची आणि त्या उत्पादनाची संयुक्तपणे ओळख होते. उदाहरणार्थ: दार्जिलिंगची चहा, सोलापूरची चादर, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. अशाच पद्धतीने आता जळगावच्या केळीला जीआय मानांकन मिळाले आहे.
- काय आहे 'अपेडा'चे कार्य?
अपेडा ही संस्था कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रयत्नशील असते. पायाभूत सुविधा विकास, गुणवत्ता विकास आणि बाजार विकास यासारख्या योजनेच्या निरनिराळ्या घटकांतर्गत निर्यातदारांना सहाय्य देऊन कृषी व प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला अपेडा प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, अपेडा आंतरराष्ट्रीय खरेदीदार व विक्रेता बैठक, आयातदार देशांसह कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हर्च्युअल व्यापारी मेळावे देखील आयोजित करते.