यावल (जळगाव) - आतापर्यंत आपण अनेक वेगवेळ्या प्रकरणात फसवणूक व दिशाभूल केल्याचे पाहिले किंवा ऐकले असेल. मात्र, जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये चक्क एका महिला वकिलानेच न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. न्यायालयात बनावट जामीन आदेश सादर केल्याने जळगाव येथील महिला वकिलाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे ४ एप्रिलला १६ वर्षीय बालकाच्या हत्येप्रकरणी संशयितास अटक केल्यानंतर पोलीस व नागरिकांमध्ये वाद झाला होता. यातील संशयित घनश्याम कोळी, कमलाकर कोळी, विजय कोळी यांना जामीन मिळण्यासाठी जळगाव येथील अॅड. राणू अग्रवाल यांनी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज ( नंबर ३१८/२० मधील आदेश २२ जून २०२०) केला होता. तसेच त्यांनी शपथपत्रात नमूद करून लिहून दिले व संशयितांचा जामीन करून घेतला.
प्रत्यक्षात यावल न्यायालयाकडून जेव्हा भुसावळ न्यायालयाकडे जामीन अर्जाची पडताळणी झाली, त्यावेळी हा जामीन अर्ज अन्य गुन्ह्यातील संशयित विकास उर्फ राजू भागवत सपकाळे याचा असल्याचे समोर आले. चौकशीअंती अॅड. अग्रवाल यांनी बनावट जामीन आदेश सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अॅड. अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याची जिल्हा सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी चौकशी केली. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली, अशी माहिती सरकारी वकील नितीन खरे यांनी दिली.
हेही वाचा - पोटात अपेंडिक्स फुटून पू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला मिळाले जीवदान
हेही वाचा - महागड्या कारमध्ये येऊन चोरट्यांनी फोडले फुटवेअरचे गोडाऊन, सव्वातीन लाखांची रोकड लंपास