जळगाव - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी अखेर भाजपाला शेवटचा रामराम ठोकला आहे. त्यांनी आज दुपारी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. भाजपा सोडल्यानंतर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. खडसे येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृत घोषणा मुंबईतून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
पक्ष नेतृत्त्वावर नाराजी
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे पक्ष नेतृत्त्वावर तीव्र नाराज होते. विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी अधिकच वाढली होती. नंतर राज्यसभा व विधानपरिषदेबाबत आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने यामागे केवळ फडणवीस असल्याची तोफ डागत खडसेंनी राज्यातील भाजपा नेतृत्वाला खुले आव्हान दिले होते.
राष्ट्रवादीप्रवेशाची चर्चा रंगली
गेल्या महिन्यापासून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. शरद पवार यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत जळगावातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करत चाचपणी केली, त्यानंतर खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला. खडसेंना पक्षात घेतल्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी द्यावी, यावर गेल्या १५ दिवसांपासून खल झाला. ते सूत्र ठरल्यानंतर अखेर त्यांचा शुक्रवारी प्रवेश निश्चित झाला आहे.
...अन् राष्ट्रवादीतील प्रवेश झाला निश्चित
मध्यंतरी खडसेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले होते. मात्र, स्वत: खडसे व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्याचे खंडन केले होते. अखेरीस आज खडसेंनी जयंत पाटील यांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला रिट्वीट केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्का मानला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रिट्वीट मागे घेतले, पण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठवून दिला.
खडसे उद्या मुंबईकडे निघणार-
खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश आता निश्चित झाला असून, ते उद्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसह मुंबईला जाणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत खडसेंच्या प्रवेशाचा सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे.