जळगाव- एसटी महामंडळाच्या बसेस कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे चार महिन्यांपासून जागेवर थांबून आहेत. प्रवासी नसल्याने या बसेसचा काही तरी उत्पन्नासाठी उपयोग व्हावा, या हेतूने या बसेसचा उपयोग मालवाहतुकीसाठी केला जात आहे. या बंद काळातील उत्पन्नात जळगाव विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या स्थानी अहमदनगर तर तृतीयस्थानी सोलापूर आगार राहिले आहे. जळगाव विभागाने अवघ्या ४५ दिवसात ४५० फेऱ्यांमधून २८ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळवले आहे.
कोरोनामुळे राज्यभरात बसेस बंद असल्याने उत्पन्न खुंटले आहे. यावर पर्याय म्हणून महामंडळाने या बसेसचे ट्रकमध्ये रुपांतर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २८ मे पासून या बसेसद्वारे मालवाहतुकीस सुरुवात झाली होती. सुरुवातीला पहिली बस ही जळगाव येथून माल घेऊन यवतमाळला धावली. यानंतर विविध उद्योगांकडून मालाची वाहतूक करण्यासाठी मागणी वाढली. यामुळे आगारात दीड महिन्यातच २८ लाखांची कमाई करीत राज्यात अव्वल नंबर मिळवला. ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक आगारात अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या वाहतुकीवर आता भर देण्यात येणार आहे. तसेच या वाहतुकीसाठी चालक व ठराविक कर्मचाऱ्यांच्या डयूट्याही लावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात आगारनिहाय मिळालेले उत्पन्न...
जळगाव- ३ लाख ७४ हजार, रावेर- ५ लाख ७५ हजार, जामनेर- २ लाख ५६ हजार, पाचोरा- १ लाख ८४ हजार, अमळनेर- १ लाख ४६ हजार, भुसावळ- १ लाख ३१ हजार, एरंडोल- १ लाख २१ हजार, यावल- ९१ हजार, मुक्ताईनगर- ४२ हजार. एकूण उत्पन्न- २८ लाख ५० हजार.