जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. आता नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोव्हिड रुग्णालयात पुन्हा एकदा नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू करण्याचा आरोग्य यंत्रणेचा विचार आहे. यादृष्टीने सर्व बाजूंनी चाचपणी केली जात आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. मे महिन्यापासून ते ऑगस्टच्या अखेरपर्यंत कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजवला होता. कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोव्हिडच्या रुग्णांसाठी अधिग्रहित केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय म्हणजेच नॉन कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठीचे रुग्णालय हे सुरुवातील शहरातील महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात हलवले. त्यानंतरही कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने जिल्हा रुग्णालय जळगाव शहरापासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित केले. यानंतरही कोरोनाचा संसर्ग वाढतच होता. त्याचप्रमाणे, नॉन कोव्हिड रुग्णांची उपचारासाठी फरफट होऊ लागली. त्यामुळे जिल्हा रुग्णालय जळगाव शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुलाबराव देवकर महाविद्यालयात हलवण्यात आले. सद्यस्थितीत याच ठिकाणी जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू आहे. त्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
जिल्हा कोव्हिड रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुमारे साडेचारशे खाटांपैकी निम्म्याहून अधिक खाटा रिकाम्या आहेत. याशिवाय कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्णही कमी संख्येने समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला आहे. त्यामुळे नॉन कोव्हिड रुग्णांची उपचारासाठी होणारी फरफट थांबावी, म्हणून जिल्हा रुग्णालय पूर्वीप्रमाणे होते त्याच ठिकाणी सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा सर्व विभागप्रमुखांशी विचारविनिमय सुरू आहे. त्याबाबत प्रत्येक विभागाकडून अहवाल मागवण्यात आले आहेत. नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्याबाबत सर्वांनी सकारात्मकता दर्शवली तर लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
अशी आहे जिल्ह्यातील सद्यस्थिती-
जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 355 एवढे 'ऍक्टिव्ह' रुग्ण आहेत. त्यातही 1 हजार 726 रुग्ण हे कोणत्याही प्रकारचे लक्षणे नसलेले तर 629 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, ऍक्टिव्ह रुग्णांपैकी अवघ्या 118 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दररोज कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त असते. हे प्रमाण गेल्या अनेक दिवसांपासून कायम असल्याने जिल्ह्याचा कोरोनाचा 'रिकव्हरी रेट' 93.03 इतका झाला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, जिल्ह्याचा मृत्यूदरही आटोक्यात आला असून, तो अवघा 2.40 टक्के आहे.
दसरा, दिवाळी सणांचा काळ असेल परीक्षेचा-
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने जिल्हा रुग्णालय पूर्वीप्रमाणे कोव्हिड रुग्णालयाच्या ठिकाणी सुरू करण्याचा आरोग्य यंत्रणेचा विचार आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत चर्चाही केली आहे. त्यावर डॉ. लहाने यांनी सकारात्मकता दर्शवली असून, तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी आरोग्य यंत्रणा प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. हा अनुभव पाठीशी असताना आगामी काळात येणारे नवरात्र उत्सव, दसरा व दिवाळीचे सण आरोग्य यंत्रणेसाठी परीक्षेचा काळ असणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.