जळगाव - स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी हे अशा दुर्दैवी परिस्थितीत मृतांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी एक नातेवाईक म्हणून पार पाडत आहेत. जात-पात, धर्म-पंथ एवढेच नव्हे तर स्वतःच्या भावना बाजूला ठेऊन ते अहोरात्र काम करत आहेत. 'त्यांच्या'मुळेच मृतांना खऱ्या अर्थाने मोक्षप्राप्ती होत आहे. म्हणूनच ते खरे कोरोना योद्धे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा खास आढावा.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील कमी नाही. दररोज दोन आकडी संख्येने कोरोनाचे बळीही जात आहेत. कोरोना पॉझिटिव्ह तसेच संभाव्य कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खबरदारी म्हणून नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार मृतदेह प्लास्टिकच्या बॅगेत बांधून त्यावर तातडीने अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीत आणणे, रुग्णवाहिकेतून तो काळजीपूर्वक उतरवून स्मशानभूमीतील दहन ओट्यावर चितेवर ठेवणे, विधी उरकून अग्निडाग देणे, चिता थंड झाल्यावर मृताची अस्थी नातेवाईकांच्या ताब्यात देणे, असे काम महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. सध्याच्या कठीण काळात ही मंडळी आपलं कुटुंब, भावना बाजूला ठेवून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मृतांवर अंत्यसंस्कार करत आहे. कितीही वाईट वाटत असले तरी मन घट्ट करण्यापलीकडे ते काही करू शकत नाही.
हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा कहर.! दिवसभरात तब्बल १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद
जळगावातील नेरीनाका परिसरातील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जातात. याठिकाणी कार्यरत असलेले महापालिकेचे कर्मचारी धनराज सपकाळे यांच्याकडे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासह संपूर्ण प्रशासकीय नोंदी ठेवणे, अंत्यसंस्काराची कागदपत्रे घेणे, प्रमाणपत्र देणे अशी जबाबदारी आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मदतनीस म्हणून अमृत बिऱ्हाडे आणि काशिनाथ बिऱ्हाडे हे दोघे सोबतीला आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्याचे काम शववाहिका चालक रियाज सय्यद करत आहेत. हे चौघे जण कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, या चौघांनी गेल्या चार महिन्यात एक दिवसही सुटी घेतलेली नाही.
बिऱ्हाडे बंधूंनी उदरनिर्वाहासाठी स्वीकारले अंत्यसंस्काराचे काम...
अमृत बिऱ्हाडे आणि काशिनाथ बिऱ्हाडे हे दोघे सख्खे भाऊ. जळगाव तालुक्यातील नशिराबाद हे त्यांचे गाव. दोघांचे शिक्षण जेमतेम, घरची परिस्थिती बेताची. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी त्यांनी स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम स्वीकारले. सध्या कोरोनामुळे स्मशानभूमीत मृतांच्या नातेवाईकांना येऊ दिले जात नसल्याने आम्हालाच सर्व सोपस्कार पार पाडावे लागतात, असे ते म्हणाले. एका दिवसाकाठी 8 ते 10 मृतांवर अंत्यसंस्कार होतात. प्रत्येक वेळी नवे पीपीई कीट परिधान करणे, मृतावर अंत्यसंस्कार झाल्यावर ते पीपीई कीट नष्ट करणे खूपच कठीण काम असते.
![Corona Warriors](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8134790_a.jpg)
पीपीई कीट घातल्यानंतर माणूस 10 मिनिटे पण राहू शकत नाही, पण आम्हाला तासनतास पीपीई किटमध्ये घालवावे लागतात. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. कोरोनाबाधित मृताचा मृतदेह स्मशानभूमीत आल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहून मन हळहळत. पण आपण काहीही करू शकत नाही. आपले काम म्हणून त्याकडे पहावं लागते. स्वतःसोबत कुटुंबीयांची खूप काळजी वाटते. घरी लहान मुले, आई-वडील, पत्नी आहे. घरी गेल्यावर त्यांच्याजवळ जायलाही जीव घाबरतो. आम्ही दोघे भाऊ एकमेकांना आधार देऊन स्वतःच मनोबल वाढवतो. शेवटी कधीतरी सर्वांना जगाचा निरोप घ्यायचाच आहे, असे मानून हे काम आम्ही करत आहोत. यातून आपल्याला नाही, किमान कुटुंबीयांना तरी पुण्य मिळेल, अशा भावूक शब्दांत बिऱ्हाडे बंधूंनी 'ईटीव्ही भारत'कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा - चिंताजनक! 'हा' आजार करतोय कोरोनाग्रस्त मुलांचे अवयव निकामी
आपलं कामच आहे, करावं लागणार...
धनराज सपकाळे हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. सध्या ते नेरीनाका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासह संपूर्ण प्रशासकीय नोंदी ठेवणे, अंत्यसंस्काराची कागदपत्रे घेणे, प्रमाणपत्र देणे अशी जबाबदारी सांभाळत आहेत. अमृत आणि काशिनाथ बिऱ्हाडे यांच्यासह ते काम करत आहेत. कर्करोगाच्या मोठ्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतरही ते स्मशानभूमीत जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनाबाधिताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे, त्यानंतर पीपीई कीट घालून अंत्यसंस्काराची प्रक्रिया उरकणे अशी दुहेरी भूमिका ते निभावतात.
अनेकदा मृतांचे नातेवाईक खूप गर्दी करतात. जोखीम पत्करून मृतदेहाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा आमच्याशी वादही घालतात. आम्हाला पोलीस बंदोबस्त दिला पाहिजे. नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे. जेणेकरून काही अनुचित प्रकार घडणार नाही, असे धनराज सपकाळे यांनी सांगितले. कुटुंब आणि कामाची जबाबदारी अशी दोन्ही आघाड्या सांभाळताना खूप कसरत होते, पण काय करणार; आपलं काम आहे करावंच लागणार, असेही ते म्हणाले.
कुटुंबाला धोका नको म्हणून भाड्याने घर घेऊन राहताय रियाज सय्यद...
जिल्हा रुग्णालयातील शववाहिकेचे चालक रियाज सय्यद हे कोरोनाबाधित व्यक्तींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणण्याचे काम करत आहेत. मृतदेह स्मशानभूमीत आणण्यापूर्वी शववाहिका सॅनिटाइझ करणे मृतदेह पोहचवल्यानंतर पुन्हा सॅनिटाइझ करणे, अशी कसरत त्यांना एकट्याला करावी लागते. कधी कधी तर मृतदेह वाहनात ठेवणे आणि खाली उतरवणे हे काम एकट्याला करावे लागते. गेल्या 4 महिन्यात त्यांनी एकदाही सुटी घेतलेली नाही. आपल्या भावना बाजूला ठेऊन काम करावे लागते. घरच्या लोकांना खूप काळजी वाटते. पण करणार तरी काय? स्वतःची काळजी घेण्यापलीकडे काही करू शकत नाही.
आपल्यामुळे घरच्यांना त्रास नको म्हणून मी भाड्याने घर घेऊन दुसरीकडे राहत आहे. घरून जेवणाचा डबा येतो, तो बाहेर खावा लागतो. कपडे स्वतः धुतो. आम्हाला कधी पीपीई कीट मिळते तर कधी नाही. कधी कधी तर नुसते हॅन्डग्लोज घालून काम करावे लागते. जीवाची पर्वा न करता काम करण्यापलीकडे पर्याय नाही, अशी खंत रियाज सय्यद यांनी व्यक्त केली.