जळगाव - राज्य सरकारकडून साडेसहा महिन्यानंतर उपहारगृह, बार सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता उपहारगृह व बारसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेतच उपहारगृह व बार सुरू राहतील. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नियमावली संदर्भात बुधवारी आदेश जारी केले आहेत.
२२ मार्चपासून बंद असलेले उपहारगृह, बार हे ५ ऑक्टोबरपासून क्षमतेच्या ५० टक्के बैठक व्यवस्थेनुसार सुरू करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानुसार ते सुरू झाले आहेत. हे उपहारगृह, बार सुरू करताना स्थानिक प्रशासनाने नियमावली निश्चित करावी, असेही आदेश दिले होते. त्यानुसार ७ ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाकडून नियमावली संदर्भात आदेश काढण्यात आले. यामध्ये सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेतच जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, रिसॉर्ट सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन योग्यरीत्या होत आहे किंवा नाही, याबाबतची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- उपहारगृह, बारसाठीची नियमावली -
प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार, डायनिंग हॉल, रिसॉर्ट बंदच राहतील.
या सेवांना सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत परवानगी असेल.
सेवा देताना तसेच प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक.
कोरोनाची लक्षणे असलेल्या ग्राहकांना प्रवेश नाही.
प्रवेशद्वारावरच ग्राहकांची तापमान, ऑक्सिजन तपासणी करावी तसेच ऑक्सिजन पातळी तपासणीपूर्वी व नंतर ग्राहकाचे बोट सॅनिटाईज करणे.
ऑक्सिजन पातळी ९५ टक्के पेक्षा कमी, तापमान १००.४ फेरणहाईट पेक्षा जास्त असल्यास तसेच फ्लूची लक्षणे असलेल्या ग्राहकांना प्रवेश नाकारावा.
प्रवेश करणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंद एका नोंदवहीमध्ये ठेवावी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ग्राहकाचे हमीपत्र घ्यावे.
हॉटेलमध्ये जेवणा व्यतिरिक्त वावरतांना मास्कचा वापर करावा.
डिजिटल पद्धतीनेच पेमेंट घेण्यात यावे अथवा रोख रक्कम घेताना आवश्यक खबरदारी घ्यावी.
पार्सल सुविधा देताना ग्राहकाची स्वाक्षरी न घेता पार्सलचा फोटो किंवा पार्सल दिल्याबद्दल त्यांचा वापर करावा.
दोन टेबलमध्ये एक मीटर अंतर आवश्यक.
रेस्टॉरंट, बारमधील कर्मचाऱ्यांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी तसेच दिवसातून किमान दोन वेळा निर्जंतुकीकरण करणे आवश्यक.
मेनू कार्डमध्ये केवळ शिजलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात यावा.
यासोबतच डायनिंग, ग्राहकांच्या आगमनापूर्वी, आगमनानंतर खाद्यपदार्थ व पेय इत्यादींच्या निर्मिती व सेवा संदर्भात, कर्मचाऱ्यांच्या वापरासंदर्भात, खाद्यपदार्थ तयार करण्याच्या जागेसंदर्भात, कचऱ्याची विल्हेवाट, कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असणारे ठिकाण, कर्मचाऱ्यांचे गणवेश, बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत वेगवेगळ्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहे.