जळगाव - येथील वसतिगृहात दोन महिलांमधील वाद व वसतिगृहातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचे चौकशी पथक नेमले आहे. त्यात एक महिला अधिकारी, पोलीस अधिकारी, दोन तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. चौकशीत जे समोर येईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.
जळगावातील एका वसतिगृहात पीडित महिलांना आश्रय देते. मात्र, या वसतिगृहात महिलांमध्ये वाद झाले, त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच जननायक फाउंडेशनच्या सदस्यांनी या वसतिगृहात गैरप्रकार होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. वसतिगृहात दोन महिलांमध्ये वाद झाले. या वादातून हाणामारी देखील झाली. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष लतीफ पिंजारी, मंगला सोनवणे, फरीद खान, कादरीया फाउंडेशनचे फारुख कादरी, आबीद शेख, वर्षा लोहार हे एका पीडितेस भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका महिलेने खिडकीतून आवाज देऊन आपल्या समस्या मांडल्या. या वसतिगृहात काही गैरप्रकार घडत आहेत, निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, अशा तक्रारी महिला करीत होती. यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल -
महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर जननायक फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, या वसतिगृहातील प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी वरिष्ठ महिला अधिकारी, डॉक्टरांचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. चौकशीत आरोपात तथ्य असल्यास संबंधितावर कडक कारवाई करू. तसेच वसतिगृहात 24 तास पोलिसांचे पथक ठेवले आहे. संबंधित महिला पोलिसांकडे तक्रार करू शकतात. चौकशी पथकाने आतापर्यंत दोन-तीन वेळा याप्रकरणात चौकशी केली आहे.
चौकशीत दोषी आढळल्यास गुन्हे - पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सांगितले की, शहरातील वसतिगृहातील प्रकाराची वरिष्ठ महिला अधिकारी चौकशी करीत आहे. जी महिला व्हिडिओत सांगते आहे ते नेमके कोणाबद्दल ते कळत नाही. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली आहे. चौकशीत जे समोर येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. वरिष्ठांना देखील याची माहिती देण्यात येणार आहे.
हेही वाचा - धक्कादायक! पोलिसांनीच वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले