जळगाव - शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. आता तर जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे. असे असले तरी जळगावकर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, म्हणून राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. पण बेफिकीर जळगावकरांनी हे निर्बंध अक्षरशः धाब्यावर बसवले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या बहाण्याने नागरिक अगदी बिनधास्तपणे घराबाहेर रस्त्यांवर हिंडतायत. जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत बाजारपेठेत खरेदी करता येणार आहे. आज (गुरुवारी) सलग दुसऱ्या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारपेठेत आल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख वाढू लागला. काही दिवसांपूर्वी दोन आकडी असलेली ऍक्टिव्ह रुग्णसंख्या महिनाभरातच साडेअकरा हजारांच्या पार गेली आहे. मृत्यूदरही अचानक वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक नवे बाधित रुग्ण समोर येत आहेत. तर दररोज किमान 20 रुग्णांचा बळी जात आहे. दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी जळगावकर नागरिक मात्र अगदी बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा वाढत जाणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज मर्यादित वेळ दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी याच धर्तीवर जळगावात देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दूध, किराणा माल अशा प्रकारच्या खरेदीसाठी प्रशासनाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अशी 4 तास मुभा दिली आहे.
गर्दीमुळे संवेदनशील असलेले भाग -
जळगावात बळीराम पेठ, सुभाष चौक, भवानी पेठ, गोलाणी मार्केट परिसर, आसोदा रस्ता, नेरीनाका परिसर अशा ठिकाणी किराणा माल, फळे व भाजीपाला, दूध अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, बाजारपेठ अशी गर्दी उसळू शकते, याची पूर्वकल्पना असूनही प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.