जळगाव - शहरात नाताळ सणाचा अपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. ख्रिस्ती बांधवांतर्फे नाताळचा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात येत आहे. नाताळनिमित्त शहरातील तीनही चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगात शांतता नांदावी, परस्परातील प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा, यासाठी ख्रिस्ती बांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली. नाताळसह नववर्षाच्या शुभेच्छांच्या वर्षावात प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा होत आहे.
नाताळनिमित्त गुरूवारी (दि. २४) रात्रीच उत्सवाला प्रारंभ झाला. यावर्षी नाताळच्या सणावर कोरोनाचे सावट असल्याने मध्यरात्रीऐवजी सायंकाळनंतरच चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला होता. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजेनंतर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत येशूचा जन्मदिवस ख्रिस्ती बांधवांतर्फे साजरा करण्यात आला. सर्वच चर्चमध्ये शांती आणि प्रेमभावना एकमेकांमध्ये नांदण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे सांगत शुभेच्छा संदेश देण्यात आला.
ख्रिस्ती बांधवांतर्फे सकाळपासूनच लगबग -
जळगाव शहरात मेहरूण तलावाजवळील सेंट थॉमस चर्च, रामानंदनगर रस्त्यावर सेंट फ्रान्सिस डी. सेल्स चर्च तसेच पांडे डेअरी चौकातील सेंट अलायन्स चर्च असे तीन चर्च आहेत. तिन्ही चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहेत. प्रत्येक चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मनोवेधक सजावट करण्यात आली आहे. प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचे देखावे साकारण्यात आले आहेत. भक्ती, प्रार्थना व उपासना असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक जण एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत होता. त्याचप्रमाणे बच्चे कंपनीदेखील एकमेकांना शुभेच्छा देण्यासह भेटवस्तूंचे आदान-प्रदान करत होते.
मध्यरात्रीपूर्वीच रंगली 'ग्लोरिया नाईट'-
नाताळनिमित्त प्रत्येक चर्चमध्ये ख्रिसमस गीतांची रंगत होती. 'ग्लोरिया नाईट' हा रंगतदार कार्यक्रमही गुरुवारी मध्यरात्रीच्या आधीच रंगला. यात प्रभू येशूंच्या जीवनावरील गीते सादर करण्यात आली. कोरोनामुळे यावर्षी नाताळ सण साजरा करण्यावर बंधने असल्याने ग्लोरिया नाईटचा रंग काहीसा फिका असल्याच्या प्रतिक्रिया ख्रिस्ती बांधवांनी व्यक्त केल्या.
नागरिकांकडून नियमांचे पालन -
जगभरात कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत नाताळचा सण साजरा होत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने योग्य त्या खबरदारीसह नागरिक चर्चमध्ये प्रार्थना करत होते. चर्चच्या प्रवेशद्वारावरच हँडसॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रार्थना करताना प्रत्येक जण एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत होते. लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. नागरिकांकडून शिस्तीचे दर्शन घडले.