जळगाव - शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाजवळ असणार्या स्टेट बँकेच्या शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून 14 लाख रुपयांची रोकड लांबवली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून ती रविवारी सकाळी उजेडात आली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला आहे. सुदैवाने एटीएमचा एक कॅश ट्रे न उघडल्याने त्यातील 7 लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाच्या अलीकडे महामार्गाच्या बाजूला स्टेट बँकेची शाखा आहे. याच शाखेच्या बाहेर बँकेचे एटीएम सेंटर आहे. त्यात एक कॅश डिपॉझिट आणि एक एटीएम अशी 2 मशिन्स आहेत. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर या एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन गॅस कटरने फोडून त्यातून 14 लाख 41 हजार रुपयांची रोकड लंपास केली. यावेळी सुदैवाने एटीएममधील एक कॅश ट्रे चोरट्यांकडून उघडला नाही. त्यामुळे त्यातील 7 लाख रुपयांची रोकड सुरक्षित राहिली. रोकड काढल्यानंतर चोरटे पसार झाले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने गेले काही दिवस चोरटे भूमिगत झाले होते. पण आता चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शहरात घरफोडीच्या घटना घडल्यानंतर आता चोरट्यांनी महामार्गावरील एटीएम फोडल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसून येत आहे.
महामार्गावरील सीसीटीव्ही तपासणार -
एटीएममधून रोकड चोरल्यानंतर चोरटे महामार्गावरून पसार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे महामार्गावर दोन्ही दिशेला असलेले सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार आहेत. त्यातून काही धागेदोरे मिळतात का? हे पाहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या ठसेतज्ञ, श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. एटीएम मशीन, दरवाजे अशा ठिकाणांचे ठशांचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत.