जळगाव - भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार हरिभाऊ जावळे यांना जीवे मारण्याची धमकी मोबाईल मेसेजद्वारे आली आहे. याप्रकरणी त्यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हरिभाऊ जावळे यांना सकाळी 10 वाजून 41 मिनिटांनी जीवे ठार मारण्याचा मेसेज मोबाईलवर आला. दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी जावळे यांनी तो वाचला. इंग्रजीमध्ये असलेल्या या मेसेजमध्ये प्रथम शिवी देण्यात आली असून त्यात 33 दिवसानंतर तुझा खून करण्यात येईल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मेसेज टाकण्याऱ्यांने आपले नाव व पत्ताही या मेसेजमध्ये दिलेला आहे. या मेसेजमध्ये संबधित व्यक्तीने आपले नाव राजेंद्र पवार असे लिहले असून जळगाव येथील व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल रोड असा पत्ताही दिलेला आहे. 'मी गेली 20 ते 25 वर्षे झाली राजकारण करीत आहे. माझे कोणाशीही वैर नाही. कधीही मी कोणाला शिवीही दिलेली नाही. त्यामुळे मला ही धमकी कशी आली हाच प्रश्न आहे. विशेष म्हणजे अशा धमक्यांना मी घाबरतही नाही. मात्र, याबाबत मी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असून त्यांच्या सांगण्यावरून मी फैजपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली आहे. तसेच मेसेजची संपूर्ण माहितीही दिलेली आहे', अशी प्रतिक्रिया हरिभाऊंनी दिली.
शांत व संयमी राजकारणी-
हरिभाऊ जावळे हे भाजपतर्फे 2 वेळा रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. तर रावेर व यावल विधानसभा मतदारसंघाचे ते गेल्यावेळी आमदार होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांना रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ते पराभूत झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. एक शांत आणि संयमी तसेच अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे.