जळगाव - शहरातील एका वसतिगृहात तेथील मुलींबाबत झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीस सुरुवात महिला अधिकाऱ्यांच्या समितीने तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीने आज तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याबाबतचा अहवाल वरिष्ठाकडे देण्यात येणार असल्याची माहिती घोडमिसे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
जळगाव शहरातील महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची धक्कादायक तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. संघटनांकडे या महीलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. गृहमंत्री यांच्या आदेशानतंर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील याप्रकरणी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करुन त्यांना तत्काळ चौकशीचे आदेश दिले.
अशी आहे समिती -
चार महिला अधिकारी यांच्या या समितीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे या अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत डॉ. कांचन नारखेडे, पोलिस अधिकारी कांचन काळे यांच्यासह अन्य एका महिला डॉक्टर अधिकारी यांचा समावेश आहे.
चौकशी सुरु; तक्रारदार महिलेचा जबाब -
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश देताच ही महिला समिती दुपारीच गणेश कालनीतील आशादिप वसतीगृहात दाखल झाली. त्यानतंर सुमारे चार ते पाच तास या समितीच्या सदस्यांकडून तक्रारदार महिलेसह वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य महिला व मुलींचे जबाबत घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलतांना समितीच्या अध्यक्षा घोडमिसे यांनी सांगीतले की, चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यात येत आहेत. आणखी काही जणांचे जबाब घ्यायचे आहेत. लवकरच याचा अहवाल तयार करुन वरिष्ठांकडे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - जळगाव वसतिगृह प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार - गृहमंत्री अनिल देशमुख