जळगाव - संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील हत्याकांडात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या हत्याकांडाच्या गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे तसेच घटनेच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या काही बाबींच्या आधारे अज्ञात आरोपींविरुद्ध अत्याचाराचे कलम वाढवल्याची माहिती देखील दिली. मात्र, या गुन्ह्याशी निगडित अनेक गूढ तसेच बाबींविषयी पोलिसांनी माहिती देणे टाळले. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांनी किती संशयितांना ताब्यात घेतले आहे, काय पुरावे मिळाले आहेत, तपास कोणत्या दिशेने चालला आहे, हे गुलदस्त्यातच आहे.
बोरखेडा येथे 16 ऑक्टोबर रोजी सकाळी चार मुलांची अज्ञात व्यक्तींनी कुऱ्हाडीने वार करत अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शेतमालकाच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तीन दिवसांपासून पोलिसांचा तपास सुरूच आहे. पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने अनेक चर्चा सुरू होत्या, तर्कवितर्क लढवले जात होते. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी रावेर पोलीस ठाण्यात संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत घटनेबाबत काही बाबी स्पष्ट केल्या.
तपासाच्या दिशेविषयी माहिती देणे टाळले
यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी या हत्याकांडाच्या तपासाची स्थिती आणि दिशा याविषयी माहिती देणे टाळले. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे सांगत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. सद्यस्थितीत सात ते आठ संशयितांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासली जात आहे. सद्यस्थितीत फॉरेन्सिक लॅबकडून कोणतेही अहवाल प्राप्त झालेले नाहीत. मृतांच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल देखील बाकी आहे. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात फक्त मृत्यूचे कारण समजले आहे. पोलीस तपासात जे पुरावे हाती लागले आहेत; त्यांचे विश्लेषण करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने काही बाबींची माहिती जाहीर केली जाईल. या प्रकरणात अजूनपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. जे लोक ताब्यात घेतले आहेत, ते संशयित आहेत. त्यात काही संशयित अल्पवयीन आहेत. या हत्याकांडाच्या अनुषंगाने पोलिसांच्या हाती आलेली माहिती आता देणे शक्य नाही. त्यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.