जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल रिंगणात; जागा वाटपाच्या सूत्रावर उद्या शिक्कामोर्तब - seats allotment Jalgaon District Bank Election
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे चारही पक्ष सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. चारही पक्षांनी आपापल्या ताकदीनुसार जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटपाच्या सूत्रावर अंतिम चर्चा झाली.
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे चारही पक्ष सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. चारही पक्षांनी आपापल्या ताकदीनुसार जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटपाच्या सूत्रावर अंतिम चर्चा झाली. याबाबतची माहिती पक्षश्रेष्ठींना देऊन उद्या (रविवारी) जागा वाटपाच्या सूत्रावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतरच कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणत्या तालुक्याची जागा व मतदारसंघ आला आहे, हे स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने मोर्चेबांधणीला वेग आला आहे. शनिवारी सायंकाळी अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चिमणराव पाटील, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदींची उपस्थिती होती.
..असे आहे जागा वाटपाचे सूत्र
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांना जागा वाटपाच्या सूत्राची माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निकडणुकीत राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनलचा पर्याय पुढे ठेवण्यात आला. त्याला चारही पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पक्षनिहाय ताकद लक्षात घेता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या वाट्याला प्रत्येकी 7, शिवसेनेला 5 आणि काँग्रेसला 2 जागा सोडण्यात आल्या आहेत. याबाबत आजच्या बैठकीत सर्वांचे एकमत झाले आहे. आता प्रत्येक पक्षाकडून आपापल्या नेत्यांना जागांची माहिती दिली जाईल. त्यानंतर उद्या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होऊन अधिकृत घोषणा केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
काही ठिकाणच्या जागांवर तिढा कायम?
दरम्यान, ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढण्याचे स्पष्ट झाले असले तरी, जिल्ह्यातील काही जागांवर अद्याप तिढा कायम असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर होऊ शकलेला नाही. या तिढ्यासंदर्भात आता पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात चेंडू असून, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सुचनेनुसार स्थानिक नेतेमंडळीला वाटाघाटीत एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पाऊल मागे?
या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसाठी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत 10 जागा लढवाव्यात, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांचा आग्रह होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात रंगलेले शाब्दिक युद्ध, आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने छापा सत्र राबवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला सोबत घेणार नाही, असा अंदाज होता. दुसरीकडे, शिवसेनेलाही केंद्रातील मोदी सरकारकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद नसल्याने शिवसेना भाजपशी वाटाघाटी करेल, यात शंका होती. पण, दोन्ही पक्षांनी आपला विरोध स्थानिक पातळीवर दूर ठेवत भाजपशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेस आपल्या पदरात 2 जागा पडल्याने खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - जळगाव : वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच एकनाथ खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र; दिव्यांग मंडळाचा दावा