जळगाव - देशभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. राज्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात कोरोना विषाणूपासून बचाव व नियंत्रणासाठी वापरात नसलेल्या पॅसेंजर गाड्यांच्या 2 रॅकमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. यात सुमारे 45 रुग्णांची सोय होणार आहे. दरम्यान, असे असलेतरी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे आजच्या घडीला अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे.
कोरोनाबाबत जागरुक राहण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून देशातील सर्वच रेल्वे स्थानकातील विभागीय व्यवस्थापकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालय प्रशासन व मंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकार्यांशी संवाद साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येणार्या सर्वच रेल्वे स्थानकांवर उपाययोजना सुरू आहेत. कोरोनाबाबत कोणती खबरदारी घ्यावी? याबाबत रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
भुसावळ यार्डात आयसोलेशन वॉर्ड -
रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ रेल्वे यॉर्डात वापरात नसलेल्या पॅसेंजर गाड्यांच्या 2 रॅकमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. साधारण एका कोचमध्ये 24 रुग्णांची सोय करण्यात आली आहे. 1 बाथरूम तसेच 1 टॉयलेटही वॉर्डात तयार करण्यात आला आहे. रुग्णांसोबत परिचारीका व डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनासाठी रेल्वेने आयसोलेशन वॉर्ड तयार केले असलेतरी आजच्या घडीला स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध नाही.
स्वच्छतेवर अधिक भर -
रेल्वे रुग्णालयाच्या फरशा, खिडक्या, रेलिंग तसेच रेल्वे स्थानकावर प्रवासी बसण्याच्या जागांवर सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनचा वापर करून प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत. दिवसातून किमान 5 ते 6 वेळा साफसफाई व स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.