जळगाव - महापालिकेची बुधवारी विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होती. परंतु, सभेच्या सुरुवातीपासूनच इंटरनेटमुळे अडथळे येत होते. अशा परिस्थितीत सभेत सदस्यांना कोणतेही मुद्दे व्यवस्थितपणे मांडता येत नव्हते. तसेच इतरांनी मांडलेले मुद्दे देखील समजत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी थेट सभागृहात येऊन गोंधळ घातला. भाजपच्या काही सदस्यांनी देखील प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शिवसेना सदस्यांनी ही सभा ऑनलाईन न घेता पूर्वीप्रमाणे सभागृहात घेण्याची मागणी केली.
महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. कोरोनामुळे घालून दिलेल्या नियमानुसार ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सभागृहात महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी यायला सुरुवात झाली. यामुळे कोणत्याही सदस्याला आपले मुद्दे मांडता येत नव्हते. तसेच इतरांचे मुद्दे देखील ऐकू येत नव्हते. त्यामुळे या ऑनलाईन महासभेचा चांगलाच फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना नगरसेवकांनी थांबविले कामकाज -
सभेत कोणताही मुद्दा समजत नसल्याने संतप्त शिवसेना नगरसेवक थेट सभागृहात दाखल झाले. तसेच कोणताही मुद्दा समजत नसल्याने ही सभा तहकूब करून सभागृहात सभा घेण्याची मागणी केली. शिवसेना सदस्य सभागृहात आल्यामुळे सभेचे कामकाज देखील थांबविण्यात आले. शासनाचे आदेश नसल्याचे सांगत सभा ऑनलाईनच घेण्यात येईल, अशी भूमिका महापौरांनी घेतली. यामुळे सभेत चांगलाच गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी नगरसचिवांना इतर महापालिकांमध्ये सभागृहात सभा होत असताना जळगावात वेगळी भूमिका का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांना चांगलेच धारेवर धरले.
भाजपचे सदस्यही सभागृहात दाखल -
शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात आल्याने काही वेळात भाजपचे देखील नगरसेवक सभागृहात दाखल झाले. भाजपच्या नगरसेवकांनी देखील इंटरनेटच्या तक्रारी करत सभागृहातच सभा घेण्याची मागणी केली. सभेचे पुढील कामकाज व्हावे, म्हणून वाद शांत करत भाजपचे नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेले. मात्र, शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातच थांबून सभेत सहभाग घेतला.
ॲड. शुचिता हाडा यांची पक्ष धोरणाविरोधात भूमिका -
महापालिका प्रशासनाला मिळालेल्या २५ कोटीतून शिल्लक असलेल्या ३ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीतील ५० लाख रुपयात शहरात शौचालय तयार करण्याचा प्रस्ताव महापौरांनी सादर केला होता. या प्रस्तावाला भाजपच्याच नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी आक्षेप घेत, शहरातील शौचालयांच्या कामासाठी अनेक सामाजिक संस्था देखील पुढे आल्या आहेत. या संस्थाकडून शौचालये उभारण्यात यावेत आणि हा निधी इतर कामांवर खर्च करण्यात येण्याची मागणी केली. सामाजिक संस्थांकडे प्रशासनाकडून पाठपुरावा होत नसल्याने ॲड. हाडा यांनी प्रशासनाचा निषेध या सभेत केला. दरम्यान, ॲड. हाडा यांच्या या भूमिकेला भाजपचेच नगरसेवक सचिन पाटील यांनी आक्षेप घेतला. तसेच महापौरांकडे हा प्रस्ताव दिला असल्याने व पक्षाच्या बैठकीत हा विषय ठरल्याने यावर सभागृहाने मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानुसार हा विषय सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, या विषयावरून भाजपमधील गटबाजी पुन्हा थेट सभागृहासमोर आली.