जळगाव - आपला शेजारी देश असलेला पाकिस्तानच्या सातत्याने कुरापत्या सुरूच आहेत. पाकिस्तानने आपल्या कुरापत्या थांबवाव्यात म्हणून भारताने सामोपचाराने, शांततेने, बंधुप्रेमाचे सर्व प्रयत्न केले. परंतु, पाकिस्तानच्या कुरापत्या काही थांबलेल्या नाहीत. भारताने पाकिस्तानच्या कुरापत्यांना वेळोवेळी समर्थपणे प्रत्युत्तरही दिले आहे. यापूर्वी भारताने दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. पाकिस्तानने आपल्या कुरापत्या थांबवल्या नाहीत तर भारताकडून पाकिस्तानवर लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल, अशी खळबळजनक माहिती भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभराच्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकारने जनहिताचे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले नसल्याचा आरोप करत भाजपकडून विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली जात आहे. याच अनुषंगाने खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.
पाकिस्तानवर लवकरच तिसरा 'सर्जिकल स्ट्राईक' 1947 पासून पाकिस्तानच्या कारवाया सुरूच-भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 पासून पाकिस्तानच्या कारवाया सातत्याने सुरूच आहेत. पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवाव्यात म्हणून भारताने सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. पण ज्या पद्धतीने आपण चांगला शेजारी निवडू शकला नाहीत, त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या कुरापत्या सुरूच आहेत. पाकिस्तानच्या कुरापत्यांना भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी पाकिस्तानवर दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान सुधारला नाही तर भारत लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक करेल, असे डॉ. भामरेंनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी-महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल बोलताना डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला नुकतेच एल वर्ष पूर्ण झाले आहे. पण गेल्या वर्षभरात सरकारने जनहिताचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्वच आघाड्यांवर महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. वर्षपूर्तीच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काहीतरी विधायक घोषणा करतील, अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्री ठाकरेंनी सूड भावनेतून पाहून घेऊ, हात धुवून मागे लागू, अशा प्रकारचे धमकीवजा इशारे दिले. मुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीने अशी भाषा वापरणे संयुक्तिक नाही. आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरली नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याची अवस्था खूपच बिकट-महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. कोरोनासारख्या महामारीत राज्यातील जनतेचे खूप हाल झाले. कोरोनाच्या नियंत्रणात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. देशात दुर्दैवाने कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात सर्वात गंभीर आहे. राज्यातील मृत्यूदरही चिंताजनक आहे. राज्यातील जनता अक्षरशः हैराण आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, मजूर, सर्वसामान्य नागरिक एवढेच नाही तर विद्यार्थीवर्गही सरकारच्या निष्क्रियतेमुळे नाराज असून, सर्वच घटकात तीव्र असंतोष आहे, असेही डॉ. सुभाष भामरे म्हणाले.
महिला, युवती असुरक्षित-
राज्यातील महिला व युवती असुरक्षित आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. परंतु, राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, अशी टीकाही डॉ. भामरेंनी यावेळी केली.