जळगाव - शहरातील एका प्रतिष्ठित उद्योग समुहाच्या तीनही कंपन्यांसह देशभरातील आस्थापनांवर प्राप्तीकर विभागाच्या पथकांनी गुरुवारी एकाच वेळी छापे टाकले. या पथकांमध्ये तब्बल १०० ते १५० सदस्य होते. या समुहाशी संबंधित असलेले सीए, अकाउंटंट, डॉक्टर, सहकारी बँक, व्यावसायिक अशा २६ ठिकाणी पथकाने तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.
हेही वाचा.... अमृता फडणवीसांना समज द्या..! संघाच्या भैयाजी जोशींना शिवसेना नेत्याचे पत्र
उद्योग समुहासह एका सुवर्ण पेढीचीही चौकशी करण्यात आली. शहरातील एका प्रतिष्ठित उद्योग समूहाने जळगावात सुरुवात करून देश-विदेशात आपला विस्तार केला आहे. या उद्योग समूहाच्या कंपन्यांवरील छाप्यांबाबत नेमके कारण समजलेले नाही. गेल्या वर्षांपासून हा उद्योग समूह नुकसान सहन करत असल्याचे कारण दाखवत नुकत्याच समाप्त झालेल्या तिमाही अहवालातही तोटा झाल्याचे नमूद केले आहे. त्यात कर विषयीदेखील संशय आल्याने प्राप्तीकर विभागाने या उद्योग समूहाच्या कंपन्यांसह त्यांच्याशी संबंधित आस्थापना, सीए, अकाउंटंट, डॉक्टर, बँक, ट्रॅक्टर दालन यांच्यावर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती आहे.
प्राप्तीकर विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांजवळ विचारणा केली असता, त्यांनी तपासणीबाबत सांगण्यास नकार दिला. शहरातील एका नामांकित सुवर्ण पेढीवरदेखील दोन अधिकाऱ्यांनी चौकशी केली. मात्र, काही संशयास्पद न आढळल्याने अधिकारी निघून गेले. या पेढीतील व्यवहार सुरळीत सुरू होते. प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यांबाबत गुरुवारी सर्वत्र चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्यक्ष अधिकारी, कंपनीसह तपासणी झालेल्या सर्वच ठिकाणी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती.