जळगाव - कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे विविध घटकांवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव आगाराला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरात जळगाव आगाराच्या उत्पन्नात तब्बल एक कोटी रुपयांची घट झाली आहे. जळगाव आगारातून पुणे तसेच मुंबईसाठी सुटणाऱ्या बस फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा मुद्दा तापत आहे. सुरुवातीला मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचे संशयित तसेच संक्रमित रुग्ण आढळून आले. त्यानंतर आता राज्यभरात ठिकठिकाणी असे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून नागरिक प्रवास टाळत आहेत. याच बाबीचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. जळगाव आगाराला आठवडाभरात एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दर दिवशी जळगाव आगाराला किमान 15 ते 20 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात सुटणाऱ्या फेऱ्यांसह स्थानिक फेऱ्यांवरही मोठा परिणाम झाला आहे.
पुणे-मुंबईच्या फेऱ्यांना सर्वाधिक फटका-
जळगाव आगारातून पुणे आणि मुंबईसाठी सुटणाऱ्या फेऱ्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्या खालोखाल औरंगाबाद, नागपूरसाठी सुटणाऱ्या फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत. पुणे, मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जळगावातून तिकडे जाण्यास कोणीही धजावत नसल्याचे चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे पुणे आणि मुंबईतून मात्र जळगावात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जळगाव आगाराने दैनंदिन फेऱ्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जळगावातून सुटणाऱ्या फेऱ्यांवर परिणाम झाला असला तरी तिकडून सुटणाऱ्या फेऱ्यांचे उत्पन्न चांगले असल्याने फेऱ्या कमी करण्यात आलेल्या नाहीत. स्थानिक फेऱ्यांचे उत्पन्न देखील आधीपेक्षा काहीअंशी घटले आहे. मात्र, तरीही स्थानिक फेऱ्या नियमित सुरू आहेत.
बसेसची स्वच्छता करण्यावर भर-
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेसची स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. बसेस स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट तसेच फिनाईलचा वापर केला जात आहे, अशी माहिती देखील जळगाव विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिली.