जळगाव- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांची बेफिकिरी तसेच खासगी रुग्णालयांकडून होणारा नियमभंग ही कोरोना संसर्ग वाढीची प्रमुख कारणे आहेत. जळगावातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर छुप्या पद्धतीने उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे तक्रारी आल्या आहेत.
संबंधित डॉक्टरांची सनद रद्द
कोरोनाबाधित रुग्णांवर छुप्या पद्धतीने उपचार करणे हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्याची त्वरित दखल घेऊन चौकशीसाठी पथके तयार केली आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी संबंधित डॉक्टरांची सनद रद्द देखील केली जाईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
भरारी पथकाची नियुक्ती
खाजगी रुग्णालयात नॉन कोविड उपचारांसोबत कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गैरप्रकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी भरारी पथक नियुक्त केले असून, हे पथक शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची आकस्मिक पद्धतीने तपासणी करणार आहे. त्यात तथ्य आढळले, तर रुग्णालय सील करण्यापासून ते संबंधित डॉक्टरची सनद रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाणार आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. त्याची कारणे शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.
काय म्हणाले जिल्हा शल्य चिकित्सक?
जिल्ह्यातील दोन रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड सुविधा एकाच छताखाली असल्याच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची तपासणी करण्यासाठी नेमलेले भरारी पथक दोन दिवसात पडताळणी करेल. त्यात कुणी दोषी आढळले तर संबंधित रुग्णालय सील करण्याची कारवाई करण्यात येईल, तसेच आपत्ती कायद्यानुसार संबंधित डॉक्टरची सनद रद्द करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.