जळगाव - शहरातील मेहरूण भागात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहांचे काम झाले आहे. याठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे निधीची मागणी केली होती. परंतु, आयुक्तांनी प्रतिसाद न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. आयुक्तांच्या दालनात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी कागदपत्रे फाडून आयुक्तांच्या अंगावर भिरकावली.
आयुक्त सतीश कुलकर्णी व नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यात झालेल्या वादाच्या वेळेस आयुक्तांच्या दालनात उपमहापौर सुनील खडके, उपायुक्त प्रशांत पाटील, प्रभाग समिती १ चे अधिकारी देखील उपस्थित होते. १४ व्या वित्त आयोगांतर्गत आलेला निधी स्वच्छ भारत अभियानावर खर्च करता येवू शकतो. स्वच्छतागृहे तयार झाल्यानंतर त्याठिकाणी रस्ता नसल्याने या रस्त्याचे काम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र, रस्त्यांचे काम हे या निधीतून करता येत नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे संतापलेले नाईक यांनी आयुक्तांसमोरच मागणीचे पत्र फाडून थेट त्यांच्या अंगावर फेकले. तसेच प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. निधी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देत नाईक यांनी आयुक्तांचे दालन सोडले.
काय आहे प्रकरण?-
मेहरूण भागातील लक्ष्मीनगर भागात स्वच्छतागृहांचे काम झाले आहे. मात्र, याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने या भागातील नागरिकांनी उपमहापौर सुनील खडके यांना 'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमाच्या वेळेस निवेदन दिले होते. उपमहापौरांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून याठिकाणचा रस्ता तयार करण्याचे सुचविले होते. हे काम शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रभागातील होते. नाईक काही दिवसांपासून यासाठी स्वतः पाठपुरावा करत होते. मात्र, निधी देण्यास आयुक्तांनी नकार दिल्याने हा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमहापौरांच्या आदेशालाही आयुक्तांनी केराची टोपली दाखवली आहे, त्यामुळे या प्रकरणाची महापालिकेच्या वर्तुळात एकच चर्चा आहे.
म्हणून नोंदवला प्रशासनाचा निषेध-
स्वच्छ भारत अभियानासाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करता येवू शकतो. रस्त्याचे काम हे स्वच्छतागृहांच्या ठिकाणी जाण्यासाठी होते. त्यामुळे निधी मिळावा, अशी मागणी आपण केली होती. मात्र, आयुक्तांनी १४ वित्त आयोगाचा निधी देण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, ४० कोटी रुपये पडून आहेत, असे असतानाही निधी मिळत नसल्याने त्यांचा निषेध व्यक्त केला, अशी माहिती नगरसेवक प्रशांत नाईक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा- बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द!