जळगाव - जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निकालात जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचे पारडे जड राहिल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हा तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीमुळे भाजपला काहीअंशी रोखण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला यश आले आहे. भाजपच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. तर काँग्रेसच्या बाजूने विचार केला तर ग्रामपंचायत निवडणुकीतील यश हे काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरणारे आहे.
जळगाव जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात 93 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या. त्यानंतर 687 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढले. काही ठिकाणी त्या-त्या पक्षांची ताकद लक्षात घेऊन 'स्थानिक आघाडी' उभारत लढा देण्यात आला. एकंदरीत, जळगाव जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना पाहायला मिळाला. त्यात समोर आलेल्या निकालांमध्ये एकूण 687 ग्रामपंचायतींपैकी जवळपास पाचशे ते साडेपाचशे ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. तर भाजपच्या पारड्यात सव्वा दोनशे ते अडीचशे ग्रामपंचायती गेल्याचा अंदाज आहे. असे असले तरी प्रत्येक पक्षाकडून आपल्या वर्चस्वाचे दावे केले जात आहेत.
असे आहे राजकीय पक्षांचे वर्चस्व
जळगाव जिल्हा हा 'जळगाव' आणि 'रावेर' अशा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. दोन्ही मतदारसंघातील राजकीय पक्षांच्या वर्चस्वाचा विचार केला तर जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद अधिक असल्याचे मानले जाते. भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात जळगाव लोकसभा मतदारसंघात मात्र, महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट होत आहे. याठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बऱ्यापैकी शह दिला आहे. या मतदारसंघात जळगाव, अमळनेर, धरणगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा या तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीसह काही गावांमध्ये स्थानिक आघाडीची जादू चालली. चाळीसगाव तालुक्यातील काही गावांमध्ये भाजपने गड राखले. त्याचप्रमाणे, रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर याठिकाणी यावल, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ या तालुक्यांमध्ये भाजपने महाविकास आघाडीसह स्थानिक आघाडीला 'फाईट' देत काही ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी भाजपला कडवी लढत देत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे.
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने बदलली समीकरणे
विशेष म्हणजे, माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपला अनेक ठिकाणी फटका बसला आहे. विशेष करून, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पर्यायाने महाविकास आघाडीला कौल मिळाला असून, भाजपची पिछेहाट झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून भाजपने अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकला असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, खडसेंच्या गटाकडून देखील भाजप दावा करत असलेल्या ग्रामपंचायतींवर खडसे समर्थकांचा विजय झाल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीमुळे येथील वर्चस्वाचा पेच कायम आहे.
नेतेमंडळी काय म्हणते?
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपल्या वर्चस्वाचा दावा केला जात आहे. एकंदरीतच, ग्रामपंचायतींच्या निकालावर एक नजर टाकली असता, महाविकास आघाडीला जळगाव जिल्ह्यात मतदारांचा कौल मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. तर भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. कॉंग्रेसच्या दृष्टीने विचार केला तर जळगाव जिल्ह्यात काँग्रेससाठी तशी फारशी अनुकूल परिस्थिती नव्हती. परंतु, महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने अनेक ठिकाणी यश मिळवले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक ही काँग्रेसला नवसंजीवनी देणारी निवडणूक मानली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवले असून काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. या पुढच्या काळात पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पुन्हा मुसंडी मारेल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, भाजपच्या वतीने बाजू मांडताना जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि भविष्यातही राहील. काही ठिकाणी पक्षाला निश्चित फटका बसला. परंतु, ग्रामपंचायत निवडणूक ही गावकी-भावकीच्या राजकारणावर होत असल्याने त्यात राजकीय अंदाज लावता येऊ शकत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचप्रमाणे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा भाजपसाठी उत्साह देणारा असल्याचे मत सुरेश भोळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - यवतमाळच्या मातीत बनले महाराष्ट्राच्या चित्ररथावरील शिल्प