जळगाव - दुचाकीवरुन जाताना पादचाऱ्याच्या हातातील पैशांची बॅग हिसकावणाऱ्याला जमावाने बेदम चोपून काढल्याची घटना घडली आहे. बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन धनराज प्रेमराज पुरोहित रस्त्याने जात होते. त्यांच्या हातातील बॅग मागून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅग घट्ट पकडून ठेवल्याने चोरटा दुचाकीवरुन खाली पडला आणि त्याचवेळी जमावाने त्याला बेदम चोपून काढले. त्यात तो जागेवरच बेशुध्द पडला. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता काव्यरत्नावली चौकाजवळ घडली. राहूल उत्तम चौधरी असे या तरुणाचे नाव आहे. त्याला व पुरोहित या दोघांना पोलिसांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणले तेथून चौधरी याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांना दिली घटनेची माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी पेठेत राहणारे धनराज प्रेमराज पुरोहित यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता ते दोन लाख रुपये काढायला गेले होते. एक वाजता ही रक्कम काढून बॅगेत ठेवली. त्यानंतर आकाशवाणी चौकाच्या दिशेने ते चालत येत असतानाच मागून दुचाकीने आलेल्या राहूल चौधरी यानी ही बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरोहित यांनी प्रसंगावधान दाखवून बॅग घट्ट पकडली. त्यामुळे ते ओढले जाऊन खाली पडले तर त्यांच्यासोबतच राहूल देखील दुचाकीवरुन खाली पडला. यावेळी पुरोहित यांनी आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी पुरोहित यांना सावरत चौधरी याला झोडपून काढले. गर्दीतूनच काही जणांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली, तोपर्यंत चौधरी याला पकडून ठेवण्यात आले.
घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, दिपक बिरारी, पो.कॉ.रवी पाटील, रविंद्र चौधरी, हरीष डोईफोडे, अजय सपकाळे, संजय तडवी, किशोर पाटील, महेश पवार यांनी कारवाई करत राहूल चौधरी याला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. धनराज पुरोहित यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.