जळगाव - देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असतानाही तळीराम आपला घसा ओला करण्यासाठी काही ना काही हातखंडे वापरत आहेत. लॉकडाऊन सुरू असताना जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगावजवळ पूर्णा नदीकाठावर गावठी हातभट्टीचा अड्डा सुरू होता. या अड्ड्यावर मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकून ७४ हजारांची गावठी दारू, रसायन, बॅरल असे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी 2 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांताराम जयराम बेलदार आणि विनोद बंडू कोळी (रा. मानेगाव, ता. मुक्ताईनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. मानेगावजवळ पूर्णा नदीकाठावर गावठी हातभट्टीची दारू पाडत असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे डीवायएसपी सुरेश जाधव यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक नीलेश सोळंके, हवालदार सुधाकर शेजोळे, संतोष नागरे, सुनील बडगुजर, अविनाश पाटील, देवा तायडे, माधव गोरेवार, लतीफ तडवी यांच्या पथकाने छापा टाकला.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर घटनास्थळावरुन दोन्ही संशयित पसार झाले. दरम्यान, अड्ड्यावरून तालुक्यात ठिकठिकाणी गावठी दारू पोहचवली जात होती. या प्रकरणात अजून काही जण सक्रिय असण्याची शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. या कारवाईनंतर पसार झालेल्या दोघांच्या अटकेसाठी पथक रवाना झाले आहे.
