जळगाव - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आधी एकाच दिवशी दोन आकडी संख्येने आढळणारे रुग्ण आता शंभरीच्या पुढे गेले आहेत. हीच स्थिती कायम राहिली तर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा बंद ठेऊ, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या विषयासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आपण निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज सायंकाळी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - 'राष्ट्रवादीला कमकुवत करण्यासाठी भाजपाने शिखर बँकेत राजकारण केले'
नागरिकांना केले खबरदारीचे आवाहन
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, नागरिकांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची खबरदारी घ्यावी. वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावणे या गोष्टींचा अवलंब नागरिकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसतील तर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
कोरोनाशी पुन्हा दोन हात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे - जिल्हाधिकारी
कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी तयार केलेल्या नियमांचे नागरिक पालन करीत नसल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मे, जून महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तशीच परिस्थिती आता जिल्ह्यात होवू द्यायची नसेल, पुन्हा लॉकडाऊन नको असेल, तर सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोनोशी दोन हात करायचे आहे. ही लढाई पुन्हा जिंकायची आहे. त्यासाठी सर्व जिल्हावासीयांनी साथ द्यावी, असे भावनात्मक आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 780 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. धोका वाढलेला आहे. गतवर्षी जशी एप्रिल, मे, जूनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती, तशी आता वाढत आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता जिल्ह्यातील बंद केलेली सर्व कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सुरू करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी ऑक्सिजन, औषधांचा साठा वाढविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बेफिकिरी खपवून घेणार नाही
दिवाळीनंतर बाधितांची संख्या घटली होती. मात्र, आता नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. गर्दीत जाणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळल्या गेल्याने बाधितांची संख्याही वाढत आहे. यापुढे बेफिकिरी खपवून घेतली जाणार नाही. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईसाठी जिल्हाभरात पथके तैनात करण्यात आली आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मिरवणुका, हॉटेल, मॉल्स येथे नियमांचे पालन होण्यासाठी ही पथके लक्ष ठेवून आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
लग्नात एकावेळी फक्त 50 जणच हवेत
लग्न समारंभात होणाऱ्या गर्दीमुळे अख्खे कुटुंब बाधित झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे, लग्न समारंभात एकावेळी केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. तेथे नियमांचे पालन होते किंवा नाही, हे तपासण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे वाढत आहे संसर्ग
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मध्यंतरी आटोक्यात आला होता. परंतु, नागरिकांनी हलगर्जीपणा केल्याने संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. बाजारपेठेत असलेली तोबा गर्दी, राजकीय सभा व मेळावे, लग्नसमारंभ अशा जाहीर कार्यक्रमांमध्ये गर्दी अनियंत्रित राहते. धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाला अटकाव करण्यासाठी आवश्यक असलेले मास्कचे वापर, वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, ही त्रिसुत्री नागरिक पाळत नाही. कोरोनाची भीती नसल्याने बहुतांश नागरिक आता मास्कचा वापर करत नाहीत. हीच परिस्थिती कोरोना वाढीला कारणीभूत ठरत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक बेफिकीर असल्याने प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे.
हेही वाचा - जळगावात पैशांची बॅग हिसकावून पळणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप