जळगाव - केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा पारित केला आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या (22 डिसेंबर रोजी) अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह विविध शेतकरी व समविचारी संघटनांच्या वतीने मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी सोमवारी जळगाव जिल्ह्यातून शेकडो शेतकरी वाहनांनी मुंबईला रवाना झाले.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून मोठा पाठींबा मिळत आहे. याच अनुषंगाने, राज्यात अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने मुंबईत अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर उद्या धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेकडो शेतकरी आज जिल्ह्यातून रवाना झाले. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाच्या मैदानावर एकत्र आले होते. याठिकाणी मुंबईतील मोर्चात सहभागाबद्दल रणनीती आखून शेतकरी रवाना झाले.
विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित-
मुंबईत आंदोलनासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच इतर समविचारी घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे यांनी सपत्नीक हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर वाहने मुंबईकडे रवाना झाली.
केंद्र सरकारने कायदा मागे घ्यावा- प्रतिभा शिंदे
दरम्यान, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या, केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. या कायद्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर शेतकरी देशोधडीला लागतील. त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे तातडीने मागे घेऊन दिल्लीतील आंदोलनाला थांबवावे. अन्यथा देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरतील. अदानी व अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना हे कायदे मागे घेण्यासंदर्भात विनंती करण्याची गरज आहे. आता शेतकरी व सर्वसामान्य जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा- राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू; मुख्यमंत्र्यांचा निर्णय