जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेतील ह्युस्टन येथे नुकताच पार पडलेला 'हाऊडी मोदी' कार्यक्रम तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेला होता. मोदींनी अशा प्रकारे एखाद्या परराष्ट्रात जाऊन विशिष्ट पक्षाचा प्रचार करणे चुकीचे आहे. ही बाब आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगत नसून अगदी विरोधात आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज (शुक्रवारी) येथे केली.
हेही वाचा - भवरखेडा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर
शहरातील गांधीतीर्थ भेट आणि सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जैन इरिगेशन कंपनीच्या विविध प्रकल्पांच्या पाहणीसाठी गेहलोत दोन दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या समारोपावेळी त्यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता विमानतळावर तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'हाऊडी मोदी' कार्यक्रम तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठीच होता.
हेही वाचा - जळगावात मत्स्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तासह लिपीकास १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
मोदींनी ट्रम्प यांच्या पक्षाच्या पाठीशी रहावे, असे आवाहन करणे चुकीचे आहे. समजा जर अमेरिकेत ट्रम्प यांच्या पक्षाऐवजी दुसऱ्या कोणत्या पक्षाचे सरकार निवडून आले तर त्या देशाचे आणि आपल्या देशाचे संबंध कसे राहतील ? हा मोठा प्रश्न आहे. हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे उचलून धरायला हवा होता, तसा तो उचलून धरला गेला नाही. आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण जगभरात निःपक्षपातीपणामुळे ओळखले जाते. मात्र, मोदींच्या अशा वागण्यामुळे ही ओळख पुसली जाण्याची भीती आहे, अशी टीका गेहलोत यांनी केली.
हेही वाचा - फादर दिब्रिटो यांची निवड म्हणजे महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची नांदी- ना. धों. महानोर
भाजप सरकारकडून ईडी व सीबीआयचा गैरवापर -
भाजप सरकार न्यायव्यवस्था, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या चौकशी संस्थांचा गैरवापर करीत आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतीत आहे. जाणूनबुजून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष केले जात आहे. प्रत्येक राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू आहे. शरद पवार, पी. चिदंबरम यांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. या नेत्यांना नाहक लक्ष करून त्रास दिला जात आहे. त्यांना लोकांमध्ये बदनाम केला जात आहे.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयात एक खास विभाग तयार करण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष करणे हे एकमेव काम या विभागाचे आहे, असा आरोप करत गेहलोत यांनी गेल्या पाच वर्षात एकही भाजप नेत्याविरुद्ध ईडी किंवा सीबीआयची चौकशी लागली नाही. तसेच छापा सत्रही भाजप नेत्यांवर राबवले नाही, असा चिमटा देखील त्यांनी काढला. देशात असे अराजक माजले असले तरी काँग्रेससह सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला एकजुटीने सडेतोड उत्तर देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
धर्म आणि सैनिकांच्या नावाखाली राजकारण -
स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच सर्वच घटकात अत्यंत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. भाजप सरकार धर्म आणि सैनिकांच्या नावाखाली राजकारण करीत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजले आहेत. देशाचा विकास दर खालावत चालला आहे. नवा रोजगार मिळणे तर दूर, जो रोजगार आहे तोदेखील जात आहे. बेरोजगारी वाढत असल्याने तरुणवर्ग नैराश्येत आहे. मात्र, सरकारला त्याची चिंता नाही. सरकार राष्ट्रीयता, धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे.
तसेच सैन्याच्या पराक्रमावर आम्हाला अभिमान आहे. स्वातंत्र्यानंतर सैन्याने वेळोवेळी आपली कर्तबगारी दाखवून दिली आहे. मात्र, भाजप सरकार चुकीच्या पद्धतीने सत्ता चालवत आहे. त्यामुळे आपल्या देशातील लोकशाही कोणत्या दिशेला जात आहे, हे नव्याने सांगायला नको, असेही ते म्हणाले.