जळगाव - विधानसभा निवडणूक अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर यावल आणि रावेर शहरांसह दोन्ही तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांना लक्ष करणारे फलक अज्ञातांनी ठिकठिकाणी लावले आहेत. या फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - जळगावातील रेशन माफियांना रान मोकळे; रावेर, यावल प्रकरणाच्या चौकशीचीही धार बोथट
'आपण यांना पाहिलंत का?' अशा आशयाचे हे फलक आहेत. प्रत्येक फलकावर विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांची छायाचित्रे आहेत. शिवाय त्यावर मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना विचारणा करणारा मजकूर आहे. सौजन्य म्हणून यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिक असा उल्लेख फलकांवर करण्यात आला आहे. एकदा निवडून येऊन दर्शन दुर्लभ झालेल्या अशा नेतृत्त्वाला पुन्हा निवडून द्याल का? असा सवाल देखील मतदारांना फलकाद्वारे करण्यात आला आहे. या फलकांमुळे यावल-रावेर मतदारसंघातील इच्छुकांमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, हे फलक नेमके कोणी लावले, कशासाठी लावले, याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकाराची सकाळी माहिती झाली. परंतु, यासंदर्भात तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.