जळगाव - अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आई-वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केला. ही घटना भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे १९ फेब्रुवारीला रात्री घडली. या प्रकरणी आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, भुसावळ न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडितेचे गावातील एका मुलाशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण मुलीच्या आई वडिलांना लागली. त्यामुळे आई-वडिलांनी मुलीचे लग्न आपल्याच समाजातील दुसऱ्या मुलाशी लावण्याचा निर्णय घेतला. मुलीने याची कल्पना तिच्या प्रियकराला दिली. त्यामुळे प्रियकराने भुसावळ न्यायालयात अर्ज करून मुलीचा बालविवाह होत असल्याची तक्रार दिली. त्यानुसार न्यायालयाने मुलीच्या आई-वडिलांना नोटीसही बजावली होती. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचा गळा दाबून हत्या केली.
हेही वाचा - मोबाईल चोरीच्या संशयातून तरुणांना विवस्त्र करून मारहाण; घटना कॅमेऱ्यात कैद
तळवेलचे पोलीस पाटील ज्ञानदेव पाचपांडे यांना याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी वरणगाव पोलिसांना याची माहिती दिली. वरणगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणला. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा हेंडवे यांनी तपासणी केल्यानंतर मुलगी मृत झाल्याचे सांगितले. मुलीच्या मृतदेहावर ओरबाडल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे या संशयास्पद प्रकरणाची माहिती डॉ. हेंडवे यांनी वरणगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांना कळवली.
जळगावच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या दोन पथकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीत मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तळवेलचे पोलीस पाटील ज्ञानदेव पाचपांडे यांच्या तक्रारीवरून सुधाकर मधुकर पाटील (वय ४६) आणि नंदाबाई सुधाकर पाटील (वय ४०) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
प्रियकराविरुद्ध दाखल केला होता गुन्हा-
या प्रेमप्रकरणाची कल्पना मुलीच्या आई-वडिलांना दीड वर्षांपूर्वीच लागली होती. त्यावेळी मुलीच्या आई-वडिलांनी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना सोबत घेऊन वरणगाव पोलिसांत प्रियकराविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्याला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षाही सुनावली होती. मात्र, त्यानंतरही दोघांचे प्रेमप्रकरण सुरूच होते. या दरम्यान मुलीच्या पालकांनी तिचे लग्न मुक्ताईनगर येथील मुलासोबत जुळवले होते. मात्र, प्रियकराने या बालविवाहाची भुसावळ न्यायालयात तक्रार केली. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही कुटुंबीयांना बालविवाहाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याच कारणामुळे समाजात आणखी बदनामी होऊ नये म्हणून पालकांनी मुलीचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.