जळगाव - सध्या जगभरात कोरोनाच्या संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. आपल्याकडेही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत संपूर्ण शासकीय यंत्रणा लढाईत रात्रंदिवस मेहनत घेत आहे. या भयावह लढाईत जिंकायचे असेल तर जनतेचीही साथ हवीय, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
मुंबईकडे जात असताना मंगळवारी अनिल देशमुख यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत धावती आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गृहमंत्री देशमुख पुढे म्हणाले, शासकीय यंत्रणा कोरोनाच्या लढाईत रात्रंदिवस मेहनत घेत आहे. पोलीस, डॉक्टर्स, नर्स त्याचप्रमाणे आशा सेविका, अंगणवाडी सेविका आपला जीव धोक्यात घालून देशसेवा करत आहेत. कोरोनाच्या या लढाईत जिंकण्यासाठी शासनाला जनतेचीही साथ हवी आहे. जनतेने नियमांचे पालन करत शासनाला साथ द्यावी, असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहाखातर गृहमंत्री देशमुख हे काही वेळेसाठी मुक्ताईनगर येथे थांबले होते. त्यांनी यावेळी शासकीय विश्रामगृह येथे कोरोनाच्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या.