जळगाव - संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील हिवरी दिगर या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गेली 5 वर्षे राज्याचे जलसंपदा खाते सांभाळणाऱ्या गिरीश महाजन यांना गावातील साध्या एका पुलाचे काम करता आले नाही. एवढेच नाही तर महाजन यांनी आपल्या कार्यकाळात एकही आश्वासन पाळले नाही, म्हणून आम्ही स्वेच्छेने मतदानावर बहिष्कार टाकत असल्याची भूमिका हिवरी दिगरवासीयांनी घेतली आहे.
हेही वाचा - बंडखोरीमुळे युतीच्या मताधिक्क्यावर परिणाम होईल, जागांवर नाही - गिरीश महाजन
हिवरी दिगर गावात वाघूर नदीवर गेल्या 5 वर्षांपासून एका पुलाचे काम सुरू आहे. मात्र, 5 वर्षात हे काम पूर्ण होऊ शकले नाही. या विषयासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, गिरीश महाजन यांनी वेळोवेळी काम लवकर पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आणि वेळ मारून नेली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच वाघूर नदीवरील पुलाचे काम पूर्ण होऊ न शकल्याने ग्रामस्थांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेवटी आज मतदानाच्या दिवशी ग्रामस्थांनी एकत्र येत मतदान प्रक्रियेवर सामूहिकरित्या बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - 'आम्ही आहोत मदतीला सर्वांनी मतदान करा', वांद्र्यातील बाल मतदार मित्रांचे आवाहन
अपूर्णावस्थेत असलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण व्हावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वाघूर नदीपात्रात उतरून आंदोलन करत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर लोकप्रतिनिधींनी गावात पाय ठेऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देखील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिला.