जळगाव - विघ्नहर्ता गणरायाची जगभरात अनेक मंदिरे आहेत. सर्वच मंदिरांमध्ये एका व्यासपीठावर गणरायाची एकच मूर्ती विराजमान असते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय येथील प्राचीन गणेश मंदिरात डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हे देशातील बहुधा एकमेव मंदिर असावे, असे सांगितले जाते. गणपतीच्या अडीच पीठांपैकी पद्मालय हे अर्धपीठ आहे. प्रवाळ क्षेत्र पद्मालय म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्रावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु, अलीकडे कोरोनामुळे हे मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे.
- जळगावपासून ३० किलोमीटर अंतरावर वसलंय पद्मालय-
पद्मालय हे तीर्थक्षेत्र एरंडोल शहरातून जाणाऱ्या नागपूर-सुरत एशियन महामार्ग क्रमांक ४६ पासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे. तर जळगावपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. 'रिद्धी-सिद्धी' सहित महागणपती प्रवाळ क्षेत्र वासिनी धरणी धराय नमः अर्थात गणपतीचे श्री क्षेत्र पद्मालय मंदिर, अशी या धार्मिक स्थळाची प्रमुख ओळख आहे. महाराष्ट्रात गणपतीची अडीच पिठे आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील मोरगाव आणि जालना जिल्ह्यातील राजूर ही पूर्णपीठे आहेत. तर पद्मालय हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. गणेश पुराणातील उल्लेखानुसार कृतवीर्य राजाच्या मुलाला हातपाय नव्हते. दत्तात्रेयाने त्याला एकाक्षरी मंत्र देऊन पद्मालय क्षेत्रात अनुष्ठानाकरिता पाठविले. गणेशाच्या कृपार्शिवादाने त्याला हातपाय येऊन सहस्त्र बाहूंचे बळ त्याला प्राप्त झाले. पुढे त्यांनीच या प्रवाळ रत्नाच्या मूर्तीची स्थापना केली. पुढे हे स्थान प्रवाळ क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. पृथ्वीचा भार सहन करता यावा म्हणून शेषनागानेही या गणपतीचे अनुष्ठान करून दुसरी गणेश मूर्ती स्थापन केली. तिचे नाव धरणीधर असे पडले.
- गोविंद शास्त्री बर्वेंनी केला मंदिराचा जीर्णोद्धार-
सन १९०४ ला सातारा जिल्ह्यातील वाई येथील गोविंद शास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. वाई येथून ते जळगाव जिल्ह्यातील तळई गावाला आले. तेथे त्यांनी मठ उभारला होता. तेथून काही भाविकांसोबत ते पद्मालयला आले. याठिकाणी त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा सिद्धी प्राप्त झाल्याने त्यांना भगवंताने गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा उपदेश केला. त्यानुसार बर्वे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.
हेही वाचा - बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती; पंचांगकर्ते ओंकार दातेंनी सांगितला मुहूर्त
- मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे भलं मोठं जातं-
मंदिराचे बांधकाम पूर्ण पाषाणात आहे. हा दगड भडगाव तालुक्यातील आमदडे पेठेतून आणला गेला. एका बैलगाडीत एकच दगड येत होता. ९ वर्षे या मंदिराचे बांधकाम चालले. बांधकाम करणाऱ्या सर्व मजुरांचा याठिकाणीच रहिवास होता. मजुरांच्या स्वयंपाकाचे दळण एका भल्यामोठ्या जात्यावर दळले जायचे. ते बैलांच्या सहाय्याने फिरत असे. हे जाते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आजही आहे. याच ठिकाणी बर्वे यांनी गायी पाळल्या होत्या. म्हणून ब्रिटिशांनी त्यांना समन्स बजावले होते. त्याचा राग आल्याने बर्वे चोपडा तालुक्यातील उनपदेव येथे निघून गेले. पुढे त्यांनी उनपदेवला समाधी घेतली. २० बाय २० फुटाचा गाभारा, ३५ बाय ३५ फुट आकाराचा मंडप तर मंदिराची उंची ८८ फुटापर्यंत आहे. मंदिरातील मूर्तींची उंची साधारणतः अडीच ते ३ फुटापर्यंत आहे. मंदिराच्या परिसरात गणपतीच्या वेगवेगळ्या २१ मूर्ती आहेत.
- पांडवांच्या वास्तव्याची आहे आख्यायिका-
या मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर दंडकारण्यात भीमकुंड आहे. १४ वर्षांच्या वनवासात पांडवानी एकचक्र नगरी एरंडोलमध्ये वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. भीमाने याच दंडकारण्यात बकासूर या राक्षसाचा वध केला आहे. भीम आणि बकासूर यांच्यात झालेल्या मल्लयुद्धाच्या खाणाखुणा अजूनही या परिसरात असल्याची आख्यायिका आहे. ऐतिहासिक, पौराणिक तसेच धार्मिक मेळ यासोबतच पर्यटनाचा मनमुराद आनंद इथे लुटता येत असल्याने वर्षाकाठी सुमारे ८ ते १० लाख भाविक पद्मालय इथल्या गणपतीच्या दर्शनाला येतात. या ऐतिहासिक बहुमोल वास्तूचे जतन तसेच परिसर विकासाची गरज आहे. दरवर्षी अंगारकी चतुर्थीला येथे लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. कार्तिक एकदशी, पौर्णिमा, श्रावणी सोमवार, पौष पौर्णिमा, माघ चतुर्थी तसेच गणेशोत्सव काळातही मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. मात्र, येथे काहीच सोयी सुविधा नसल्याने भाविकांचा हिरमोड होतो. त्यासाठी या मंदिर विकास आराखड्याच्या तातडीच्या अंमलबजावणीची गरज आहे.
- मंदिरातील घंटा ठरते भाविकांसाठी आकर्षक-
या गणेश मंदिराच्या परिसरात समोरच एक महाकाय घंटा आहे. तिचे वजन सुमारे साडेचार मण इतके आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि रूपे या पंच धातूंनी ती बनवली आहे. या घंटेत सुमारे एक पंचमांश म्हणजेच ८० किलो सोने आहे. नेरी गावातील कुलकर्णी यांनी ही घंटा काशी येथून बनवून आणली होती. सुरुवातीला या घंटेला धातूची लोळी होती. तिचा आवाज पंचक्रोशीपर्यंत जात होता. मात्र, धातूच्या लोळीमुळे घंटेला तडे पडत असल्याने ती काढून लाकडी लोळी लावण्यात आली आहे. मंदिरातील ही घंटा भाविकांसाठी आकर्षक ठरते. ती चोरीला जाऊ नये म्हणून साखळदंडाने ती बांधली आहे.
हेही वाचा - पुण्यापाठोपाठ मुंबईतही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी