जळगाव - आज 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. परंतु, प्रेम दिवसाच्या नावाखाली अनेक तरुण आणि तरुणी अश्लील चाळे आणि बीभत्स वर्तन करतात. हा प्रकार हिंदू संस्कृतीला शोभनीय नाही. म्हणून 'व्हॅलेंटाईन डे'च्या नावाखाली गैरकृत्य करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना पुढे आली आहे. आज (रविवारी) असे कोणी सज्ञान प्रेमीयुगुल सापडले तर त्यांचे रितीरिवाजनुसार थेट लग्न लावून देऊ, असा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने खणखणीत इशारा देण्यात आला आहे.
हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आज शहरातील टॉवर चौकात व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. व्हॅलेंटाईन डे साजरा करणे, ही भारतीय संस्कृती नाही. व्हॅलेंटाईन डे ही पाश्चात्य संस्कृती असून, ती चुकीची आहे. भारतात आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करून तिचे उदात्तीकरण करतोय. प्रेम करण्याला विरोध नाही. मात्र, व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांना आमचा विरोध असल्याची भूमिका यावेळी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
पालकांनी सजग होण्याची गरज -
'व्हॅलेंटाईन डे'ला विरोध करणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने भूमिका मांडताना मोहन तिवारी यांनी सांगितले की, व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली सर्वत्र गैरप्रकार घडतात. तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करतात. हे कुठेतरी थांबायला हवे. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. तिचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. हाच आमचा मूळ उद्देश आहे. आपले पाल्य चुकीच्या वाटेला जाऊ नये, यासाठी पालकांनी सजग राहण्याची गरज आहे. आज जर आम्हाला कुणी सज्ञान गैरप्रकार करताना आढळले तर आम्ही त्यांच्या पालकांना बोलावून लग्न लावून देऊ. अल्पवयीन असतील तर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करू, असे मोहन तिवारी यांनी सांगितले.
हेही वाचा - नागपूर : प्रेमाच्या दिवशी अश्लीलतेला बजरंग दलाचा विरोध